बँकेत ठेवलेल्या ठेवी देण्यास बँकेने नकार दिल्याने खातेदाराने गेटवरच आयुष्य संपवलं
Beed News: गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ माजली होती. त्यानंतरही टोळक्याने एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीहोती.या सर्व घटनांनंतर बीडमधून आणखी एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. बीडमधील गेवराईत एका व्यक्तीने खाजगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गेवराईतील छत्रपती मल्टीस्टेट बँकेसमोर एका ठेवीदाराने गळफास घेत आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जाधव यांनी बँकेच्या गेटवरच गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. गेवराईतील खळेगाव येथे सुरेश जाधव (वय ४०) यांनी बँकेत ११ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी बँकेकडे वारंवार पैशांची मागणी केली होती. पण बँकेने पैसे न दिल्याने जाधव यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासून समोर आली आहे. गेवराई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बुधवारी सकाळच्या सुमारास बँकेचे कर्मचारी बँकेच्या आवारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना या सुरेश जाधव यांचा मृतदेह दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सुरेश जाधव यांनी किती रक्कम बँकेत ठेवली होती. याची संपूर्ण माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे
जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेत ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत ५ लाख रुपये ठेवले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची अत्यंत गरज असतानाही सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली ठेव परत मिळाली नाही. या आर्थिक आणि मानसिक तणावातून त्यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं.
जाधव आपल्या कुटुंबासह रात्री उशिरा बँकेत गेले होते. काही वेळातच ते बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मल्टीस्टेट बँकांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.