बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. मी कोणावर टीका करणार नाही. मतदारसंघातील जिरायती भाग बागायती करून यासाठी केंद्राची मदत घेऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेसह अन्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगत आपण जर दमबाजी केली असती तर 32 वर्ष जनतेने मला निवडून दिले असते का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदारसंघांच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची
सांगता सभा आज मिशन हायस्कूल मैदानावर पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, मनसेचे नेते सुधीर पाटसकर यांच्या अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आपण बारामतीकर एक परिवार असून बारामती महत्वाचा तालुका म्हणून देशाच्या नकाशावर आहे. आजच्या भोर-वेल्हा, दौंड, इंदापूर येथे मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. तसाच बारामतीच्या सांगता सभेचा उत्साह पाहिल्यावर समाधान वाटले. आजची सभा माझ्या लक्षात राहील, मतदान करताना भावनिक होऊ नका कोणी विकास केला, तर उद्या निधी मिळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
आजपर्यंत विकास करताना राज्यातील निधी मिळेल, दौंड, इंदापूर, हवेली तालुक्यातील काही गावातील पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे. बारामती शिक्षण, आरोग्याचे हब आहे. मी कधी जाती पातीचे राजकारण केले नाही. सर्व जातींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीचे घटक म्हणुन राहुल कुल, विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील युतीचे घटक आहे. यापुढे आम्ही एकमेकाला विरोध करायचा नाही. यापुढे आम्ही एकत्र काम करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.