अकोल्यात बँक अधिकाऱ्यावर चौघांकडून अत्याचार; व्हिडिओ बनवून ८० हजार उकळले
अकोला शहरात ‘गे-डेटिंग’ अॅपच्या माध्यमातून एका बँकेच्या अधिकाऱ्याला जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अधिकाऱ्यासोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करत त्याचे चित्रीकरण केले आणि नंतर व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करत तब्बल ८० हजार रुपयांची आर्थिक लूट केली. खदान पोलीस ठाण्याने या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बँक अधिकारी एका ‘गे-डेटिंग’ अॅपवर सक्रिय होता. याच अॅपवरून एका व्यक्तीसोबत त्याची ओळख झाली. काही दिवस संवादानंतर १४ जून रोजी हिंगणा फाट्याजवळ प्रत्यक्ष भेट ठरली. तिथे मनीष नाईक नावाचा युवक आला आणि बँक अधिकाऱ्यासोबत तो नदीकाठी एका अज्ञात ठिकाणी गेला.
तेथे त्यांनी समलैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर मनीषने आपल्या आणखी तीन साथीदारांना बोलावून घेतलं. चौघांनी मिळून बँक अधिकाऱ्यावर जबरदस्ती केली. या दरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं आणि नंतर त्याच्या आधारे पीडिताला पैसे देण्यास भाग पाडण्यात आलं. पीडित अधिकाऱ्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पहिल्या टप्प्यात ३० हजार रुपये देण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी होत गेली आणि एकूण ७९,३०० रुपये उकळले गेले. यानंतर बँक अधिकाऱ्याने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक मनोज केदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विशेष सापळा रचला. केवळ मोबाईल क्रमांकाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. त्यासाठी पीडित अधिकाऱ्याला पुन्हा भेटीची तयारी करावी लागली. मनीष नाईक पुन्हा ठरलेल्या ठिकाणी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यासोबत मयूर बागडे यालाही ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष नाईक याच्याकडे एक विशेष प्रकारचे इंजेक्शन होते. समलिंगी व्यक्तींना उत्तेजित करण्यासाठी तो हे इंजेक्शन वापरत असे. त्यानंतर अत्याचार केला जात असे. पोलिसांकडून चौघांच्या इतर गुन्ह्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.या प्रकरणात अन्य कोणी फसवणुकीचा बळी ठरला असल्यास त्यांनी पुढे यावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. समाज माध्यमांवरून सुरू असलेल्या अशा गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे आणि सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.