पाणीटंचाईचे सावट ! अकोल्यात पावसाअभावी करपू लागली पिके
अकोला : राज्यासह देशातील अनेक भागात पाऊस सुरू असताना अकोला जिल्ह्याला मात्र गेल्या महिनाभरापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. हवामान विभागाकडून या कालावधीत जिल्ह्यासाठी अनेकदा यलो अलर्ट जारी करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच जलप्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता अधिक गडद झाली आहे.
पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागांतील पिके सुकण्याच्या आणि करपण्याच्या मार्गावर आहेत. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या संकटातून सावरत असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार जिल्ह्याची पावसाची टक्केवारी ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी आहे.
गेल्या महिन्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी पावसाची टक्केवारी वाढली. त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने त्या पावसाचा सध्याच्या पिकांना फारसा फायदा झालेला नाही. शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजत असून त्यांची वाढ खुंटली आहे.
महान धरणात 25 टक्के जलसाठा
शेतकऱ्यांच्या चिंतेसोबतच अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठाही सध्या अवघा २५ टक्के राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात अकोला शहरावरही पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतीचे नुकसान होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोटारपंपाचे वीज कनेक्शन बंद
शेतातील विहिरींवर मोटरपंपासाठी वीज कनेक्शन मिळावे म्हणून महावितरणकडे डिमांड भरले. मात्र, दोन-तीन वर्षे उलटूनही वीजपुरवठा न झाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यातच डिमांडची रक्कम परत करण्याची पत्रे पाठवून नवीन वीज कनेक्शनऐवजी सौरऊर्जेचा पर्याय स्वीकारण्यास सांगितले जात असल्याचा आरोप किसान सभेने केला.
Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…






