बोरगाव ( मंजू ) : ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा ग्रंथालय संघ या संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या विभागामार्फत ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०२२ चालविण्यास मान्यता मिळाली आहे. सदर प्रशिक्षण एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये होणार असून,परीक्षा जून २०२२ च्या प्रथम आठवड्यात होणार आहे. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
[read_also content=”तहसील कार्यालयावर पूरग्रस्त महिलांचा धडक मोर्चा https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/flood-hit-womens-agitation-at-tehsil-office-nraa-255848.html”]
प्रवेश अर्ज १४ मार्च २०२२ पासून गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, विठ्ठल नगर, अकोला येथे मिळतील. सदर अर्ज ३१ मार्च २०२२ पर्यंत स्वीकारणे सुरू राहणार आहे. या प्रशिक्षणानंतर शाळा, कॉलेज, आय. टी. आय., न्यायालये, महामंडळ, रेल्वे आदिमध्ये ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल सेवक या सारख्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी सुशिक्षित बेरोजगार, युवक, युवतींनी, ग्रंथप्रेमी नागरिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्याम वाहुरवाघ यांनी सांगितले आहे.






