File Photo : Solapur ZP
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची प्रतिष्ठित समजली जाणारी कर्मचारी पतसंस्था क्र- १ च्या लढतीत अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे स्थापित परिवर्तन विकास पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. विवेक लिंगराजनिर्मित समर्थ विकास पॅनल सर्व उमेदवारासह विजयी झाले आहेत.
रंगभवन चौक परिसरातील रॉजर्स इंग्लिश स्कूल येथे रविवारी मतदान घेण्यात आले. प्रारंभी सकाळच्या सुमारास अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, अनिल जगताप यांनी मतपत्रिकेवरील अस्पष्ट चिन्हावरून मतदान प्रक्रिया रोखून धरली. सत्ताधारी गटाला सहकार विभाग मदत करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तब्बल सव्वा तासाने मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. याच दरम्यान विवेक लिंगराज यांच्या पॅनलला मतदारांकडून साहनभूती मिळण्यास सुरुवात झाली.
परिवर्तन पॅनलकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा प्रचार मतदान केंद्र परिसरात करण्यात आला. येथेचं कलाटणी मिळाली आणि विवेक लिंगराज यांचे पॅनल बहुमताने निवडून आले. दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये वातावरण ढवळून निघाले होते.
विजयी उमेदवार आणि मिळालेली मते
सत्ताधारी समर्थ विकास पॅनलकडून श्रीधर कलशेट्टी (५७५), सुरेश कुंभार (५३६), विशाल घोगरे (५४०), शहाजहान तांबोळी (५४८), विष्णू पाटील (५७१), शत्रुघ्नसिंह माने (५६२), गजानन मारकड (५४१), तजमुल मुतवल्ली (५६५), शिवानंद म्हमाणे (५५८), किरण लालबोंद्रे (५५३), विवेकानंद लिंगराज (६३३), विकास शिंदे (५३४) हे सर्वसाधारण तर महिलांसाठीच्या दोन संचालकांसाठी श्वेतांबरी राऊत (५४२), मृणालिनी शिंदे (५३६), अनुसूचित जातीसाठी चेतन वाघमारे (५७४), विमुक्त जातीसाठी शिवाजी राठोड (६२५), तर इतर मागाससाठी विजयसिंह घेरडे (५७२) मते घेऊन विजयी झाले.
समर्थ विकास पॅनलच्या उमेदवारांना ५३४ ते ६३३ मते
सत्ताधारी समर्थ विकास पॅनलच्या उमेदवारांना ५३४ ते ६३३ तर विरोधी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना १६६ ते ३०५ मते मिळाली. विरोधी परिवर्तन विकास पॅनलचे प्रमुख अविनाश गोडसे यांना ३०५ तर विद्यमान चेअरमन विवेक लिंगराज यांना सर्वाधिक ६३३ मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांनी सांगितले.
अनेक जण स्वार्थासाठी एकत्र आले
पतसंस्था क्रमांक एक च्या या निवडणुकीत सभासदांनी एकतर्फी समर्थ पॅनलवर भरघोस विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अनेक जण स्वार्थासाठी एकत्र आले. परंतु पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी ही निवडणूक पतसंस्थेचे अस्तित्वासाठी मनावर घेतली होती. त्यामुळे समर्थ पॅनल निवडणूक लढवली असले तरी सभासदांनी निवडणूक हातात घेतली होती व त्यांनी वर्तन तपासले व समर्थ नैतिक अधिष्ठान आहे. अशांच्या हातात नेहमीच सत्ता आणि विश्वास प्रदान केला आहे.
यश अपयश येत असते, जात असते. विजयी झाल्याबद्दल कोणीही अहंकारात जाऊ नये किंवा अपयश आले म्हणून कोणीही खचून जाऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून पुढील निवडणुकीची तयारी करणार आहे .






