सौजन्य - नवराष्ट्र टीम
भोर/ रुपेश जाधव : सध्या भोर नगरपरिषदेची निवडणूक मोठ्या रंगतदार वळणावर असून, विविध पक्षाचे, गटाचे उमेदवार सक्रीय झाल्याने स्थानिक मुद्द्यावर चर्चा झाल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असतानाच भोर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पाच दिवस होऊन फक्त चारच अर्ज दाखल झाले आहेत परंतु अवघे दोनच दिवस बाकी असूनही अद्याप राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाहीत, यापूर्वी सर्व निर्णय एकहाती घेणाऱ्या राजकीय नेत्यांसमोर उमेदवारांची नावे जाहीर करताना प्रथमच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजपचे उमेदवार जाहीर करताना माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. यापूर्वी काँग्रेसच्या राजवटीत कोणाला उमेदवारी द्यायची किंवा बसवायचे याचे सर्व निर्णय संग्राम थोपटे एकहाती घेत असत. तसेच याच निर्णयामुळे भोर नगरपरिषद एकहाती ठेवण्यास कोणतीच अडचण आली नाही. मात्र यावेळी उमेदवारांची नावे जाहीर करताना प्रथमच सर्वांना विश्वासात घेताना दमछाक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. आता निवडणूक कार्यक्रम सुरु असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवसच बाकी आहेत. मात्र तरीही उमेदवारांची नावे जाहीर होत नसल्याने मोठ्या प्रमाणात सस्पेन्स वाढला आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांना द्यावा लागणार न्याय
भाजपमध्ये पूर्वाश्रमीचे अनेक नेते, कार्यकर्ते असून भोर शहरासह तालुक्यात भाजपची सत्ता नसली तरी भाजपचे कमळ अखंडपणे फुलवत ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी थोपटे यांच्याकडे गळ घातली आहे. मात्र प्रत्येकवेळी आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घेण्याच्या पद्धतीला फाटा देवून जुन्या नव्यांची सांगड घालीत सर्वांना बरोबर घेवून जावे लागणार आहे. भाजपच्या पूर्वाश्रमीच्या अनेक नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची म्हणून यापूर्वीच तयारी केली असून, स्वतंत्र- पणे प्रचार यंत्रणा राबविण्यात आली आहे त्यामुळे थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपच्या कार्यकत्यांना थोपटे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
संग्राम थोपटेंपुढे बंडाळी रोखण्यासाठीचे आव्हान
नगराध्यक्षपद वगळता १० प्रभागामधून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. मात्र भाजपकडे नगराध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत, तर नगरसेवक पदासाठी एका एका प्रभागातून अनेक जण इच्छुक आहेत. काहींनी आपल्याला उमेदवारी नाही मिळाल्यास महिलांच्या प्रभागात पत्नी, बहिण, चुलती, आई यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत, ऐन निवणुकीच्या काळातच संग्राम थोपटे यांचे समर्थक व माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. तर काही उमेदवार भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या संपर्कात असल्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यातच माजी नगरसेवक गणेश पवार व संजय जगताप यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरु असून त्यामुळे उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करताना थोपटे यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शंकर मांडेकर, रणजित शिवतरेंच्या जाळ्यात अडकणार?
भाजपने राष्ट्रवादीशी यापूर्वीच युती केली असून, भोर नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी आमदार शंकर मांडेकर व जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे कोणतीही संधी सोडणार नाहीत त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांसाठी शिवतरे यांनी आपले दरवाजे आधीपासूनच खुले ठेवले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी मिळण्याची खात्री नसलेले किती उमेदवारी शिवतरेंच्या जाळ्यात अडकणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






