साताऱ्यातील सातही पर्यटक सुखरूप, दहशतवादी हल्ल्यावेळी होते 'गुलमर्गमध्ये'
सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांचे कुटुंबीय, नातेवाईक चिंतेत आहेत. सातारा जिल्ह्यातील 7 जण जम्मू काश्मीरला गेले आहेत. सुदैवाने घटनेवेळी ते पहलगामपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुलमर्गमध्ये होते. त्यामुळे सर्वजण सुरक्षित आहेत.
सातारा जिल्हा प्रशासन आणि आपल्या कुटुंबीयांच्या ते संपर्कात आहेत. दोन दिवसात आम्ही घरी पोहचू, असे त्यांनी कटुंबीयांना सांगितलं आहे. पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेलेल्यांमध्ये माधवी मिलींद कुलकर्णी, त्यांचा मुलगा महेश कुलकर्णी, त्यांचे नातेवाईक श्रीधर शामराव क्षीरसागर, वर्षा श्रीधर क्षीरसागर, सुखदा श्रीधर क्षीरसागर (सर्व रा. कराड), कौटुंबिक मित्र शरद हरिभाऊ पवार आणि त्यांच्या पत्नी विद्या शरद पवार (सातारा) यांचा समावेश आहे. महेश कुलकर्णी हे इंटेरियर डिझायनर आहेत, तर शरद पवार हे एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सर्वजण सध्या श्रीनगरमध्ये सुखरूप असून सातारा जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावेळी आम्ही सर्वजण गुलमर्ग होतो, अशी माहिती महेश कुलकर्णी यांनी दिली. गुलमर्गमध्ये असल्यामुळे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. स्थानिक वृत्तवाहिनीवरील बातमीमुळं दहशतवादी हल्ला झाल्याचं कळलं. त्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींचे फोन, मेसेज येऊ लागले. आम्ही कुठं आहोत? सुरक्षित आहोत का? याची त्यांनी विचारपूस केली. त्यामुळं दहशतवादी हल्ल्याचं गांभीर्य आमच्या लक्षात आलं, असे त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मिरात वाढवली सुरक्षा
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नाकांबदी आणि गस्त सुरू आहे. संशयितांची तपासणी केली जात आहे, अशी माहितीही महेश कुलकर्णी यांनी दिली. तसेच साताऱ्यातील आम्ही सर्वजण श्रीनगरमधील हॉटेलमध्ये सुरक्षित आहोत. दोन दिवसात आम्ही साताऱ्यात पोहचू, असंही त्यांनी सांगितलं.
नौदलातील अधिकाऱ्याची हत्या
हरियाणातील करनालचे रहिवासी आणि नौदलातील लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नीसमोर गोळ्या घालून दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यांचं आठवड्यापूर्वीच लग्न झालं होतं. नवविवाहित दाम्पत्य पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेलं होतं. साताऱ्यातील पर्यटक आणि नरवाल दाम्पत्याचं श्रीनगरमधील ‘लक्झरी इन’ याच हॉटेलमध्ये वास्तव्य होतं. बुधवारी सकाळी हॉटेलमध्ये येऊन मिलिटरी जवान नरवाल दाम्पत्याबद्दलची माहिती घेऊन गेल्याचंही महेश कुलकर्णी यांनी सांगितलं.