दानवेंचे सुधाकर बडगुजर यांच्याबाब मोठे विधान (फोटो- सोशल मिडिया)
छत्रपती संभाजीनगर: महायुतीतील सगळ्या पक्षांचा बाप भाजप असल्याने आमचा मुख्यमंत्री बसलाय,” असे वक्तव्य करून भाजप आमदार नितेश राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे एकच वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री नितेश राणे यावरून समज दिल्याचे समजते आहे. अशा प्रकारे कोणाचा बाप काढणे योग्य नसल्याची समज फडणवीस यांनी नितेश राणे यांना दिल्याचे समजते आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “नितेश राणे यांचे वडील नारायण राणे आहेत. नारायण राणे नितेश राणे यांचे बाप आहेत तर फडणवीस यांचे बाप कसे झाले हे समजले नाही.”
पुढे बोलताना अंबादास दानवे सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीवरून बोलताना म्हणाले, “बडगुजर कुठे जातात माहीत नाही. ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात गेलेल्या अनेक लोकांना भाजपने घेतले आहे. त्यामुळे हा आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.” मराठवाड्यातील ट्रॅक्टर मोर्चावर बोलताना दानवे म्हणाले, ” विधानसभा निवडणुकीत अनेक वचने देण्यात आली होती. त्याची आठवण करून देण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा आहे.
नितेश राणे यांच्या अशा वाक्यांनी महायुतीतील सामंजस्याला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे भाजपकडून अशा वक्तव्यांवर आळा घालण्याचे संकेत मिळत आहेत. भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड आता मनसेकडूनही उठवली जात आहे. नारायण राणे यांनी अलीकडेच प्रकाश महाजनांवर केलेल्या टीकेनंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी राणे पिता-पुत्रांना थेट इशारा दिला आहे.
“नारायण राणे जर राज ठाकरे आणि तुमचे संबंध सांगण्यापलीकडे असतील, तर तुम्ही तुमच्या बोलघेवड्या पुत्राला आवर घालणं अपेक्षित आहे,” असे म्हणत किल्लेदार यांनी नारायण राणेंना खडे बोल सुनावले. याचबरोबर, “महाराष्ट्र सैनिकांना धमक्या देण्याची हिंमत करू नका. आम्ही उगाच कोणाच्या काड्या करत नाही आणि काड्या करणाऱ्याला सोडतही नाही,” अशा शब्दांत त्यांनी नितेश राणेंना इशारा दिला. महायुतीतील ‘बाप’ वादावरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षात आता मनसेच्या एण्ट्रीनं वातावरण आणखी तापलं असून आगामी काळात या वादाला कोण वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.