अमरावतीत 13 नोव्हेंबर रोजी भाजपने पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या दुकानांवर दगडफेक जाळपोळ आणि धार्मीक हिंसाचार झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये सध्या तणाव पसरला आहे. अशा या धार्मीक तणावाच्या परिस्थितीत अमरावतीच्या मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत.
या तणावाच्या वातावरणातही दोन्ही समाजातील सुजाण मंडळींनी धार्मिक सौहार्द राखत मानवतेची शान कायम ठेवली आहे.
हिंसाचारानंतर मुस्लीम बहुल परिसरात असलेल्या हिंदू मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करत आहेत. हिंदू-मुस्लीम एकतेचा चांगला संदेश दिला जात आहे. अमरावतीच्या इतवारी हा मुस्लीम बहुल परिसर आहे. मात्र त्याच परिसरात हिंदू धर्मियांचं शिव मंदिर आहे. हे मंदिर अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे. या हिंसाचाराला हिंदू-मुस्लीमचा रंग देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मंदिराला कोणी काही करू नये, म्हणून मुस्लीम बांधव सरसावले आहेत. या मंदिराचे मुस्लिम बांधवांकडून रक्षण करण्यात येत आहे.
तर, दुसरीकडे खोलापुरी गेट मार्गावरील हिंदुबहुल दगडी पूल भागातील दर्गा, जुना सराफा बाजारातील मशीद आणि गडगेश्वर भागातील दर्गा मुस्लीम बांधवांच्या या धार्मीक स्थळांचे संरक्षण हिंदू बांधवांनी केल्यामुळे या वस्तूंना धक्काही लागला नाही.
अशा या तणावाच्या परिस्थितीत प्रसिध्द अभिनेते मनोज बाजपेयी यांची एक कविता चर्चेत आली आहे. ‘भगवान और खुदा’ असं या कवितेचं शिर्षक आहे.