औसा : शेतातील विहिरीवरील विद्युत पंपास नवीन वीज जोडणीसाठी दोन हजारांची लाच (Bribe Case) स्वीकारताना बेलकुंड (ता.औसा) येथील महावितरण कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञ सतीश उत्तमराव कांबळे (वय 38, रा. हंगरगा ता. निलंगा) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Corruption News) सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार व्यक्तीच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतजमिनीमधील विहिरीवर विद्युत पंपासाठी नवीन वीजजोडणीसाठी महावितरणकडे अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने हे काम करण्यासाठी तंत्रज्ञ सतीश कांबळे यांनी तक्रारकर्त्याकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती पंचासमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत औसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रलंबित कामासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने तक्रारकर्त्याने तंत्रज्ञ यास 17 मे रोजी संपर्क साधला. मात्र, पुन्हा पैशांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करून औश्यातील तुळजापूर टी पॉईंट येथे ही कारवाई करण्यात आली.