File Photo : Anil Desai
वडूज : माण खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरेंना येत्या विधानसभा निवडणुकीत धूळ चारण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते व कार्यकर्ते कंबर कसत आहे. सध्या कोणत्याही पक्षाचे नेते नसलेले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हे महाविकास आघाडीतून उमेदवारी घेण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यातच त्यांनी ‘आता माघार घेणार नाही, माण-खटाव विधानसभा लढणारच’, असे विधान केले आहे.
खटाव तालुक्यातील वडूज येथे माण खटाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या नेतृत्वात बुथ प्रमुख आणि अनिल देसाई यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीची पूर्वतयारी, बूथ मजबुती आणि कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी याबाबत चर्चा करण्यात आली.
आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देसाई यांनी ‘मागच्या पंचवार्षिक 2019 मध्ये निवडणुकीच्या वेळी ‘आपलं ठरलंय टीम’च्या वतीने माझं नाव विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी फायनल करण्यात आलं होतं. मात्र, ज्यांनी माझं नाव फायनल केलं, त्यांनीच उमेदवारी स्वतः घेतली. तरीही नाराज न होता, आपण त्याचं काम केलं. त्यावेळी मी उमेदवारी अर्ज मागे घेताना सर्वांनी मला 2024 ला उमेदवार म्हणून संधी देण्याचं सर्वांनी मान्य केलं’.
शरद पवार साहेबांनी मला शब्द दिलाय
आता सर्वांनी दिलेला शब्द पाळावा आणि मला उमेदवारी मिळवण्यासाठी पाठीशी राहावं. ज्येष्ठ नेते माजी मंत्री शरद पवार साहेबांनी मला शब्द दिला. तुतारी चिन्हावर मी आगामी विधानसभा लढणार आहे. मी कोणत्याही पक्षाचा नेता नसताना देखील केवळ जनतेच्या सेवेसाठी दोन तप अविरत कामं करत आलोय आणि फक्त एका मेसेजवर एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत.