पाटस : पोलिसांची खाकी वर्दी फक्त चोर, गुन्हेगारांना पकडणे, कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याचेच काम करत नाही, तर या पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या वेगवेगळ्या कलेत माहीर असतात. मग ते गायन, क्रिकेट असो की इतर कोणत्याही खेळ, पोलिसांमध्ये अनेक गुण असतात. ते म्हणतात ना, आवड असली की सवड मिळते. ती आवड शालेय जीवनातच असावी लागते. मग संधी मिळाली की, ते सोनं करतात.
शालेय जीवनातच धावणे तसेच इतर मैदानी खेळांची आवड असलेले अनेकजण असतात. पाटस पोलीस चौकीचे तत्कालीन आणि सध्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल मास्टर्स गेम्स २०२४ या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत महाराष्ट्राला धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्यपदक मिळवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पोळे यांनी दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीलीस दलाचीच नव्हे, तर महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याचे काम केले आहे. तसेच त्यांनी पाटस पोलीस चौकीचा कायापालटही केला. पाटस पोलीस चौकीत तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यांना उन्हात आणि पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. चौकीच्या आवारात गवताची घाण, अपघातग्रस्त वाहनांनी गर्दी यामुळे ही पोलीस चौकी आहे हे वाटत नव्हते. मात्र, केशव वाबळे यांनी पोलीस चौकीच्या समोर पत्राचे बांधकाम करून नागरिकांना बसण्यासाठी निवारा उपलब्ध करून दिला.