Chiplun News Foodies Delight At Vashishthi Agricultural Festival Special Attraction Of Cooking Competition On 8th And 9th January
Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
शेतकऱ्यांच्या कष्टांचा अभिमान आणि महिलांच्या हातातील पाककलेची जादू यांचा सुरेख संगम असलेला वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव 5 ते 9 जानेवारी या कालावधीत होत आहे.
चिपळूण : कोकणच्या मातीचा सुगंध, शेतकऱ्यांच्या कष्टांचा अभिमान आणि महिलांच्या हातातील पाककलेची जादू यांचा सुरेख संगम असलेला वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव 5 ते 9 जानेवारी या कालावधीत होत आहे. या महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा ही महिलांच्या कलागुणांना व पारंपरिक खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ देणारी ठरणार आहे. दि. 8 जानेवारी रोजी ‘गोड पाककला’ स्पर्धा तर 9 जानेवारी रोजी ‘तिखट पाककला’ स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत स्वा. वि. दा. सावरकर मैदान, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे महोत्सवाच्या ठिकाणीच पार पडतील, अशी माहिती वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.
वाशिष्ठी कृषी महोत्सवात शेतकरी, पशुपालक, बचतगट, महिला उद्योजिका तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे पाककला स्पर्धा होय. ही स्पर्धा दोन प्रकारांत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित असून, स्पर्धकांनी वाशिष्ठी डेअरीच्या दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेली पाककृती सादर करणे अनिवार्य आहे.
एकच स्पर्धक गोड व तिखट पदार्थ वाशिष्ठी प्रॉडक्टपासून बनवू शकतात. दोन्ही प्रकारांत वेगवेगळे क्रमांक काढले जातील. पदार्थ बनविण्याकरिता लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वखर्चाने आणायचे आहेत. सजावटीसाठी व पदार्थ बनविण्यासाठी खाद्यपदार्थांचा वापर करावा. प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत. पदार्थ बनविण्यासाठीचा जास्तीत जास्त कालावधी एक तास असेल. जो पदार्थ बनवणार आहात, त्याची रेसिपी व कृती एका कागदावर सुवाच्च अक्षरात लिहून आणणे. तसेच आपला पदार्थ बनविण्यासाठी लागणारा वेळ आयोजकांना आधी कळवावा लागेल. चव, सजावट, नाविण्य आणि पौष्टीकतेला प्राधान्य देण्यात येईल. रेसिपी बनवताना व्हेज किंवा नॉनव्हेज असा उल्लेख करावा. या पाककला स्पर्धेचा निकाल 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
कोकणच्या कृषी संस्कृतीला चालना देणारा, महिलांच्या पाककलेतील कौशल्याला सन्मान देणारा आणि वाशिष्ठी डेअरीच्या दुग्धजन्य उत्पादनांचा दर्जा अधोरेखित करणारा हा कृषी महोत्सव नागरिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. ‘गोडवा वाशिष्ठी प्रॉडक्ट्सचा. प्रत्येक क्षण आनंदाचा.’ या ब्रीदवाक्याप्रमाणे हा महोत्सव कोकणवासीयांच्या मनात कायमस्वरूपी गोड आठवण निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.