फोटो - सोशल मीडिया
अमरावती : अमरावतीची जिल्हा नियोजन बैठक जोरदार चर्चेत आली आहे. महायुतीमध्ये असणारे प्रहार नेते बच्चू कडू व भाजप नेते रवि राणा यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे. बैठकीमध्येच दोन्ही नेत्यांनी फिनेल मिलवरुन एकमेकांना खडेबोल सुनावले. हा सर्व प्रकार जिल्हा नियोजन बैठकीला आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर झाला. बैठकीनंतर बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राणा विरुद्ध कडू असा वाद सुरु झाला आहे.
भाजप आमदार रवि राणा व प्रहार नेते बच्चू कडू यांच्यामध्ये अचलपूरमधील फिनले मिलवरून श्रेयवाद रंगला. हा वाद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सुरु झाला. फिनले मिलसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपये मंजूर केले. त्यावरून आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले मात्र हे मानत असताना राजकीय वक्तव्य करण्याचा प्रयत्न केल्याने बच्चू कडू संतापले. आमदार कडू यांनी, सहा महिन्यांपूर्वीच याला मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले. मात्र आमदार राणा हे काही आरोप करण्याचे थांबले नाहीत. यानंतर राणा आणि कडू यांच्यात चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच भर बैठकीत मोठी खडाजंगी झाली. त्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला.
बच्चू कडूंचा प्रतिक्रिया देताना संताप
आमदार बच्चू कडू म्हणाले, -एक वर्षाअगोदर सभेत मी याबाबत लक्षवेधी केला होता. लक्षवेधीमध्ये अचलपूर येथील मील एकतर राज्य सरकारने चालवायला घ्यावी नाहीतर केंद्रामध्ये चालवावे. केंद्र सरकार पैसे द्यायला तयार नसेल तर राज्य सराकारने ते द्यावेत. तसेच चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली त्याला एक वर्ष झाले त्यानुसार पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. एक वर्षाआधी 20 कोटी आम्ही देतो असा प्रस्ताव आला आहे, प्रस्ताव केंद्राने पाठवला तो स्विकारला नाही. आता त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो तो अतिशय निंदनीय आहे. स्वत: च्या मतदारसंघात दोन मिल बंद आहेत, तेथील कामगार उपाशी मरतो आहे ना त्यांना घर भेटले ना जागा भेटली. या राणा परिवारात एक आमदार आणि एक खासदार होते तरीही मील सुरु करु शकले नाही. ज्या मिलवर आम्ही सातत्याने प्रयत्न केला, 100 टक्के पगार देण्याचा प्रयत्न केला. नवनीत राणा खासदार असताना केंद्र सरकारची मिल असून 50 टक्केच पगार दिला जात होता. मिल कॉंग्रेसच्या काळात सुरु झाली आणि भाजपच्या काळात बंद पडली याचा विचार केला पाहिजे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, स्वत: च्या मतदारसंघातील मिल चालू करु शकले नाही आणि आता फिनले मिल चालू करत आहेत हा मूर्खपणा आहे, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.