सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (फोटो-महासंवाद)
मुंबई: वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोशनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
याबाबत मंत्री ॲड. शेलार म्हणाले, “जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे.”
शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर विविध गणेशोत्सव मंडळ जे धार्मिक प्रथा परंपरानुसार सहभागाने पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा केली आहे. तसेच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन करण्यात येणार असून पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यातील सर्व भागात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार असून यावर्षीपासून घरबसल्या नागरिकांना गणरायांचे दर्शन व्हावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळामध्ये भजनी मंडळांना भजनामधील साहित्यासाठी थेट लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना घोषित झाली आहे. परदेशातही गणरायाचे आगमन धुमधडाक्यात व्हावे, म्हणून हा राज्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, ही भूमिका घेण्यात आली आहे.
हा ‘गणेशोत्सव- राज्य महोत्सवाचा’ शासन निर्णय गणरायाच्या चरणी घोषित करताना आनंद होत असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. याबाबत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रम यांचे दोन स्वतंत्र सविस्तर शासन निर्णय ही जारी करण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे कला अकदामी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या महोत्सवाचे नियोजन व समन्वय करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात असा असेल महाराष्ट्र शासनाचा सहभाग