70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मिळणार 10 लाखांपर्यंत उपचार; 'आयुष्मान वय वंदना' योजना ठरतीये फायद्याची... (File Photo : senior citizen)
नागपूर : जिल्ह्यातील ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आता १० लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या विशेष तरतुदीनुसार ‘आयुष्मान वय वंदना’ कार्डधारक ज्येष्ठांना ही वाढीव आरोग्यसुरक्षा मिळणार आहे. ही सुविधा आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) अंतर्गत लागू केली आहे.
सर्वसाधारण आयुष्मान योजनेत कुटुंबाला वार्षिक ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांची मर्यादा आहे. शहर व जिल्ह्यातील अंदाजे १ लाख २० हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्ह्यातील सर्व शासकीय व आयुष्मान योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयांमध्ये ही कॅशलेस आणि पेपरलेस उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहे.
‘आयुष्मान वय वंदना’ योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, अतिदक्षता विभागातील उपचार तसेच विविध शस्त्रक्रियासारख्या महागड्या वैद्यकीय सेवांचा समावेश केला आहे. त्यामुळे ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.
घरी बसून कार्ड तयार करण्याची सुविधा
‘आयुष्मान वय वंदना’ कार्ड तयार करण्यासाठी ‘आयुष्मान’ मोबाईल अॅपचा वापर करता येतो. करून ‘७०+’ पर्याय निवडावा लागतो आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आधार पडताळणीनंतर वैयक्तिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करता येते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्ड डाऊनलोड करता येते. याशिवाय, नागरिकांना सीएससी सेंटर, सूचिबद्ध रुग्णालयातील आयुष्मान काऊंटर किंवा संबंधित योजना कार्यालयात जाऊनही नोंदणी करता येणार आहे. मोबाईलवर प्राप्त झालेल्या ओटीपीद्वारे लॉग-इन केल्यानंतर आयुष्मान वय वंदन कार्ड मिळू शकणार आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला चांगला प्रतिसाद
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत पुणे एसटी विभागातून जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात ७३ लाख ७२ हजार ३६७ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे. ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे, ज्या अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यांचा लाभ मिळतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) या योजनेसाठी ५८५ रुपये भरून एक स्मार्ट कार्ड घ्यावे लागते, ज्यामुळे वर्षभर प्रवास मोफत करता येतो.
हेही वाचा : ICC T20 World Cup 2026 : बांगलादेशचा घमंड चकनाचूर! विरोधात पडली मतं; ICC कडून दुसऱ्या पर्यायाचा विचार






