सना व नवाब मलिक यांच्यासाठी भाजप विधानसभेसाठी प्रचार करणार का हे आशिष शेलार यांनी केले स्पष्ट (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महायुती म्हणून भाजप, शिंदे गट व अजित पवार गट पहिल्यांदाच विधानसभा एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. जागावाटपामध्ये अनेक जागांवर मतभेद निर्माण झाले आहेत. नवाब मलिक यांच्यावरुन भाजप व अजित पवार यांच्यामध्ये मतभेद झाले. नवाब मलिक यांच्यावर खटला सुरु असल्यामुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र नवाब मलिक यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे नवा ट्वीस्ट आला आहे. आता भाजप सना मलिक यांचा प्रचार करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक हे सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबधित जमीन व्यवहार व मनी लाँडरिंगप्रकरणी यांच्यावर खटला सुरु आहे. सध्या नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीबाबत मलिकांना भाजपा व शिंदे गटाकडून तीव्र विरोध केला आला. यामुळे अजित पवार यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र या विरोधाला न जुमानता अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीचे पक्ष आता नवाब मलिकांचा मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये प्रचार करणार का? आणि सना मलिक यांना पाठिंबा देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. यावर आता भाजपाकडून प्रतिक्रिया आली आहे.
भाजप आमदार व मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायचे असं ठरलं होतं. विषय फक्त नवाब मलिकांच्या उमेदवारीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) मलिक यांना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबत यापूर्वीच आमची भूमिका सांगितली आहे. मी देखील वारंवार भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा एकदा सांगतो की अजित पवारांनी मलिकांना उमेदवारी दिली असली तर भाजपा त्यांचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आशिष शेलार यांनी मांडली आहे.
नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना देखील अजित पवार गटाने अणूशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचार भाजप करणार का याबाबत देखील आशिष शेलार यांनी मत व्यक्त केले आहे. शेलार म्हणाले, भाजपाने मलिकांचा प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही. सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) अणूशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्या प्रकरणात नवाब मलिकांना अटक झाली होती, त्या प्रकरणातील सना मलिकांच्या सहभागाबद्दलचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. असा कोणताही पुरावा मिळत नाही तोवर सना मलिक या राष्ट्रवादीच्या म्हणजेच महायुतीच्या आणि पर्यायाने भाजपाच्या उमेदवार असतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा नाही पण सना मलिक यांचा प्रचार भाजप करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.