अथणी शुगर्स रयत युनिट साखर कारखान्याचा बिल थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले (फोटो - istock)
Satara News : कराड : शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाचे (Sugarcane News) बिल थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करून विश्वासार्हतेची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले. उगवलेल्या सोन्यासारख्या पिकाचे योग्य भाव मिळाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
या हंगामात कारखान्याने एकूण ४ लाख १९ हजार ८०८ मेट्रिक टन ऊस गाळप केला. शेवटच्या टप्प्यात गाळप झालेल्या ऊसाला प्रति मेट्रिक टन ३५०० दराने अंतिम बिल अदा करण्यात आले. एकूण १४६.९३ कोटींची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील यांनी दिली.
हे देखील वाचा : मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास
कारखान्याने यंदा विस्तारीकरणाची कामे पूर्ण करून वाढीव क्षमतेने गाळप केले. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आल्याने औद्योगिक प्रगतीला नवे बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर चेअरमन उदयसिंह पाटील यांनी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. मात्र, अवेळी पावसाचा फटका बसल्याने ऊस उत्पादनात घट झाली आणि त्यामुळे गाळप उद्दिष्ट पूर्ण करता आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांचे मोलाचे योगदान
या यशस्वी हंगामात अथणी शुगर्सचे चेअरमन श्रीमंत पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व सीएफओ योगेश पाटील, युनिट हेड रविंद्र देशमुख, तसेच अधिकारी, कर्मचारी, ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांचे मोलाचे योगदान राहिले. पुढील गळीत हंगामातही शेतकरी आणि कारखाना यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : कराड तालुक्यात प्रभाग रचनेवर 28 गावांतून 66 हरकती दाखल; ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले
स्मार्ट मीटरवरून करवडी ग्रामस्थांचा वीज कार्यालयात चार तास ठिय्या
स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत करवडी (ता. कराड) येथील ग्रामस्थांनी बुधवारी ओगलेवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांची सहमती न घेता सुमारे २०० घरांमध्ये जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात आले. या मनमानी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या देत जोरदार निदर्शने केली.






