कराड तालुक्यात प्रभाग रचनेवर 28 गावांतून 66 हरकती दाखल; ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापले (फोटो - सोशल मीडिया)
कराड : कराड तालुक्यात लवकरच होणाऱ्या १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनांवर हरकतींचा पाऊस पडला आहे. ७ ते १३ एप्रिलदरम्यान हरकती नोंदविण्याची मुदत असताना तब्बल २८ गावांमधून ६६ हरकती दाखल झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता या हरकतींवर काय निर्णय घेतला जाणार, याकडे ग्रामस्थांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून कराडची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या या भागात प्रत्येक निवडणूक चुरशीची ठरत असते. यंदाही ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वीच वातावरण तापले असून, प्रभाग रचनेवरून गावागावात चर्चा रंगू लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत सत्तांतर झाले असले, तरी बहुमत नाजूक असल्याने राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतही तगडी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच प्रभाग रचनेवरून निर्माण झालेली ही चुरस आगामी राजकीय लढतीचे संकेत देत आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सज्ज झाले असून, प्रत्येक गावात समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया यंदा विशेष रंगतदार ठरणा असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हरकतींचे गावनिहाय चित्र
प्रभाग रचनेवर सर्वाधिक हरकती कोडोली आणि सैदापूर या गावांतून प्रत्येकी ७ दाखल झाल्या आहेत. वस्ती साकुर्डी आणि विरवडे येथे प्रत्येकी ६ हरकती आल्या आहेत. याशिवाय साकुर्डी (५), पोतले (४), साजूर व सुर्ली (प्रत्येकी ३), तर इतर अनेक गावांतून कमी संख्येने हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
७७ गावांनी प्रभाग रचना मान्य
एकूण १०५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २८ गावांमध्ये हरकती आल्याने उर्वरित ७७ गावांनी प्रभाग रचना मान्य केल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र ज्या गावांत हरकती आल्या आहेत, तेथे स्थानिक स्तरावर मतभेद तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
पुढील कार्यवाहीसाठी वेळापत्रक जाहीर
प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, २१ एप्रिल : हरकतींवर सुनावणी, २३ एप्रिल : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर, २८ एप्रिल : अंतिम प्रभाग यादी निवडणूक आयोगाकडे पाठविणे, तर ४ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.






