वर्धा : पतीसोबत पटत नसल्याने तीन वर्षापूर्वी आरोपीकडे शेतीकामाला आलेल्या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यानंतर तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकवून जिवंत जाळण्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही घटना अल्लीपूर येथे २७ मार्च रोजी दुपारी २ ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, यातील जखमी ४७ वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नसल्याने तीन वर्षांपूर्वी वर्धेवरून अल्लीपूर येथे आली. तिला आरोपीने तिच्याच पैशाने आबादी जागेत झोपडा बांधून दिला. आरोपी हा तिच्यासोबत अडीच वर्ष चांगला राहिला. त्यानंतर त्याने सदर महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केला. पण, पत्नीला सांगतो म्हटल्यावर तो तिला बोलत असल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दिली नाही. सदर पीडित महिला २७ मार्च २०२२ रोजी शेतावरून आल्यानंतर घरी ती कुलरमध्ये झोपली. तेव्हा आरोपीने फोन करून काय करत आहेस, असे म्हणून फोन ठेवला. काहीवेळातच आरोपी महिलेच्या घरी येऊन तिच्यावर जबरदस्ती करू लागला.
महिलेने आरडाओरड करत नकार दिल्याने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला काडीने पेटवून देत तो निघून गेला. यात महिला गंभीर भाजली आहे. त्यानंतर गावातील गजू मेघरे याच्या मदतीने महिलेला सेवाग्राम कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून विठ्ठल संतोष ढोंगरे रा. अल्लीपूर याच्याविरुद्ध अल्लीपूर पोलिस ठाण्यात विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.