औरंगाबाद – शिवसेना असो की भाजप सर्वांनीच आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला, औरंगाबादचे नामांतर हे त्याचेच एक उदाहरण आहे, औरंगाबादच्या जनतेला आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार? असे म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत शिवसेनेसह भाजपवर हल्ला चढवला.
आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबादसह उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा हा निर्णय यापूर्वीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून शेवटच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. पण ती बैठक बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्याने तो निर्णय अवैध असल्याचे सांगत आज पुन्हा औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, त्यावरुन इम्तियाज जलील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर केले. तेव्हापासून या नामांतरावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एमआयएमने सुरुवातीपासूनच याला विरोध केला असून, याविरोधात मुकमोर्चा देखील काढण्यात आला होता.