फोटो सौजन्य - Social Media
हिवाळ्याची चाहूल लागताच बाजरी आणि ज्वारीसारख्या पारंपरिक भरड धान्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पूर्वी ग्रामीण भागापुरती मर्यादित असलेली ही धान्ये आज बदलत्या जीवनशैलीमुळे शहरांपर्यंत पोहोचली असून, आरोग्याबाबत जागरूक असलेल्या प्रत्येक घटकाच्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. कधीकाळी गरिबांचे अन्न म्हणून ओळखली जाणारी बाजरी आणि ज्वारी आता हेल्थ-कॉन्शस लोकांपासून ते उच्चवर्गीयांच्या ताटापर्यंत स्थान मिळवत आहेत. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आणि पचनसंस्थेशी संबंधित आजार वाढत असल्याने लोक पुन्हा पारंपरिक आणि नैसर्गिक अन्नाकडे वळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर बाजरी-ज्वारीला केवळ अन्नधान्य न मानता जीवनशैलीचा अविभाज्य घटक म्हणून पाहिले जात आहे.
शेतकऱ्यांच्या मते, बाजरी आणि ज्वारी ही शरीराला ऊब देणारी, पचायला हलकी आणि भरपूर पोषणमूल्ये असलेली धान्ये असल्याने हिवाळ्यात त्यांची मागणी साधारण ३० टक्क्यांनी वाढते. फायबर, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने यांचा समृद्ध स्रोत असलेल्या या धान्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे शहरातील लोकांमध्ये भाकरी, थालीपीठ, डोसा, उपमा अशा विविध पदार्थांच्या माध्यमातून बाजरी-ज्वारीचा वापर वाढला आहे. हायप्रोफाइल रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्येही ‘मिलेट-बेस्ड’ पदार्थांना विशेष मागणी असून, सुपरमार्केटमध्ये या धान्यांना प्रीमियम दराने विक्री केली जात आहे.
मात्र, वाढती मागणी असूनही शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. बियाणे, खत, कीटकनाशके, मजुरी आणि वाहतूक खर्च यामध्ये गेल्या काही वर्षांत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असतानाही बाजरी-ज्वारीच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झालेली नाही. उत्पादन खर्च वाढूनही भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. पूर्वी स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेली ही धान्ये आज शहरांमध्ये महाग दराने विकली जात असली, तरी त्याचा फायदा थेट उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. बाजारातील दरातील चढउतार आणि दलालांवर अवलंबित्व यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत.
एकीकडे आरोग्य-जाणिवेमुळे बाजरी-ज्वारीला मोठी मागणी मिळत असताना, दुसरीकडे उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांच्या पिक नियोजनात बदल होताना दिसत आहेत. काही शेतकरी अधिक नफा देणाऱ्या पिकांकडे वळत असून, काहीजण बाजरी-ज्वारीची लागवड टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पारंपरिक अन्नधान्याला मिळणारी ही नवी ओळख सकारात्मक असली तरी, त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दर, हमीभाव आणि बाजारव्यवस्था मजबूत होणे गरजेचे आहे. बाजरी आणि ज्वारी आज केवळ अन्नधान्य न राहता आरोग्यदायी जीवनशैलीचे प्रतीक बनत असून, या बदलत्या प्रवाहात शेतकरी आणि ग्राहक यांचा समतोल साधणे ही काळाची गरज ठरत आहे.






