फोटो सौजन्य - Social Media
करमाळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला असून सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक अत्यंत चुरशीची, रंगतदार आणि अनिश्चिततेने भरलेली ठरली असून अंतिम निर्णय मतदारराजाच्याच हाती आहे. ‘मतदार जोमात आणि नेते कोमात’ अशीच स्थिती सध्या करमाळा शहरात पाहायला मिळत आहे. यंदा तब्बल ७३ टक्के मतदानाची नोंद झाली असून ही टक्केवारीच निकाल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दि. ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात येऊन आता दि. २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
लक्ष्मीदेवी नेमकी कुणावर कृपा करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी यंदा पंचरंगी लढत पाहायला मिळत असून शिवसेनेकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी सौ. नंदिनी जगताप, भाजपकडून नेते कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनिता देवी, करमाळा शहर विकास आघाडीकडून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत, राष्ट्रीय समाज पक्षाकडून भावना गांधी, तर अपक्ष म्हणून प्रियंका वाघमारे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
या निवडणुकीत विकासकामांपेक्षा आर्थिक देवाणघेवाणीचीच अधिक चर्चा रंगली असून एका मतासाठी तीन ते पाच हजार रुपये दिल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. “निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतातच, मग पैसे घेण्यात गैर काय?” असा सूर काही मतदारांकडून व्यक्त झाल्याचेही बोलले जात असून मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून पालकमंत्री गोरे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, युवा नेते दिग्विजय बागल, मार्गदर्शक विलासराव घुमरे आणि जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार करण्यात आला असून करमाळा नगरपालिकेत कमळ फुलणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. तर गेली तीस वर्षे नगरपालिकेवर सत्ता असलेल्या जगताप गटाने केलेल्या जनसेवा आणि विकासकामांच्या जोरावर यंदाही शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला आहे.
यंदाची निवडणूक केवळ द्वंद्वापुरती मर्यादित न राहता तिरंगी राजकीय लढत बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुकाध्यक्ष भरत आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यामुळे प्रत्येक प्रभागातील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. करमाळा शहर विकास आघाडीनेही परिवर्तनाची मोठी लाट असल्याचा दावा करत सत्ता मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. एकूणच धनशक्ती की जनशक्ती यापैकी नेमका कोणाचा विजय होणार, हे चित्र २१ डिसेंबर रोजी निकालातूनच स्पष्ट होणार असून करमाळा नगरपालिकेची ही निवडणूक तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.






