पुणे- रविवारी (ता. ४ ) पुण्यात आयोजित पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
शहर प्रमुख प्रमाेद ऊर्फ नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय भाेसले यांनी यासंदर्भात पत्रकार परीषदेत माहीती दिली. यावेळी युवा सेना सचिव किरण साळी हे उपस्थित हाेते. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर गेल्या तीन महीन्यापासून बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची शिवसेना यांच्यात शक्तिप्रदर्शन केले जात आहे. पुण्यात माजी नगरसेवक नाना भानगिरे आणि अजय भाेसले यांच्याकडे शिंदे गटाची जबाबदारी साेपविली गेली आहे. गेल्या तीन महीन्यात वाॅर्ड स्तरापर्यंत पदाधिकारी नियुक्ती झाली आहे, युवा सेना आणि महीला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे. शहरात पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे भानगिरे यांनी नमूद करीत, रविवारी शहरातील शिवसैनिकांचा मेळावा आयाेजित केला आहे. हा मेळावा नाना पेठ येथील महात्मा फुले हायस्कुल (अहिल्याश्रम ) येथे दुपारी चार वाजता पार पडणार आहे. या मेळाव्यास खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहे. तसेच पक्षाचे प्रताेद भरत गाेगावले, उपनेते शिवाजीराव आढळराव – पाटील प्रवक्ते विजय शिवतारे, नरेश म्हस्के, खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असे भानगिरे यांनी नमूद केले.
या मेळाव्याच्या निमित्ताने इतर पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे प्रवेश देखील हाेणार आहेत. राज्यात सत्ता आल्यानंतर शहरात प्रथमच हा मेळावा हाेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही शक्तिप्रदर्शन करणार आहाेत. पुढील दाेन महीन्यात सारसबागेजवळ पक्षाचे संपर्क कार्यालय सुरु हाेणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी या कार्यालयाचा शुभारंभ हाेईल असेही भानगिरे यांनी नमूद केले. आगामी महापािलका निवडणुक डाेळ्यासमाेर ठेवून पक्षाकडून तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष ठेवून आहेत. ते साेडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चांदणी चाैकातील वाहतुकीच्या काेंडीच्या प्रश्नातून आपल्याला दिसुन आले आहे. पुण्यातील समान पाणी पुरवठा, वाहतुक , रिग राेड , पे अॅंड पार्क आदी प्रलंबित विषयांवर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे हे आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीतून पुण्याच्या संदर्भात चांगले निर्णय राज्य सरकार घेईल असा विश्वास भानगिरे यांनी व्यक्त केला.






