रिक्षा थांबाच स्थानकाच्या बाहेर हलवला (File Photo : Swargate Depot)
पुणे : स्वारगेट एसटी स्थानक प्रशासन आणि रिक्षाचालक यांच्यात वाद पेटला आहे. स्थानकात रिक्षाचालकांना रिक्षा थांबविण्यास मनाई केली गेली आहे. त्यामुळे चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. स्वारगेट बस स्थानक येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी आता थेट रिक्षा थांबाच स्थानकाच्या बाहेर हलवला आहे.
मेट्रो स्थानकाचे काम सुरु असल्याने या भागातील रिक्षा थांबा हा एसटी स्थानकाच्या जागेत हलवण्यात आला होता. या भागात रिक्षा उभ्या करण्यास एसटी प्रशासनाने तोंडी परवानगी दिली होती. आता एसटीच्या प्रशासनाने स्थानकाच्या कोपऱ्यातील रिक्षा थांबाच बाहेर काढला आहे. यामुळे स्वारगेट येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. एसटी प्रशासन आमच्या पोटावर पाय देत असल्याचा आरोप रिक्षाचालकांकडून केला जात आहे. ‘आम्हाला आतमध्ये जागा द्या, अन्यथा आम्ही बुधवारपासून आंदोलन करणार’, असा इशारा रिक्षाचालकांनी दिला आहे.
दरम्यान, रिक्षा आत आणण्यास मज्जाव केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. लहान मुलेसोबत असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी यांना बॅगा, पिशव्या घेऊन रस्त्यावर यावे लागत आहे. त्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे.
अत्याचाराची घटना आली होती समोर
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुढील १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सर्च ऑपरेशन राबवत त्याचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न
स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे. या अत्याचारप्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेला तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक त्याच्या गुनाट गावी घेऊन गेले होते. गाडे फरार झाल्यानंतर लपलेल्या ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत त्याचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंभर एकर शेत धुंडाळून देखील गाडेचा मोबाईल सापडला नाही.