सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : महायुतीकडून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून, अनेक नेत्यांचा नागपूर येथे शपथविधी पार पडला. या शपथविधीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही जुन्या चेहऱ्याला डावलण्यात आल्याचं पाहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मनगंटीवार यांना देखील डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याचं बोलल जात आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच महायुती सरकारचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
बावनकुळे म्हणाले की, ते पक्षाचे नेते असून, ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी संघटनेत देखील काम केलं आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. पक्ष योग्य व्यक्तीचा योग्य निर्णय करत असतो असं यावेळी बावनकुळे म्हणाले. पुण्यात होत असलेल्या पुस्तक महोत्सवाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केल.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुणे शहरात पुस्तक महोत्सव होत आहे आणि या पुस्तक महोत्सवातून काही शिकण्यासाठी मी आलो आहे. देशात कुठेही एवढं मोठं आयोजन करण्यात आलं नाही अस आयोजन पुस्तक महोत्सवात करण्यात आलं असून, देशातील काण्याकोपऱ्यातून लोक या पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. आणि हे पाहण्यासाठी मी येत असल्याचं यावेळी बावनकुळे म्हणाले.
हे सुद्धा वाचा : धुळ्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक; शिवशाही बस पेटवली
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक नेते हे नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले, हा पक्षाचा निर्णय असतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तर केंद्रीय पातळीवर निर्णय घेतले जातात. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात निर्णय हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे घेत असतात. कुठेही नाराजगीची गोष्ट नाही. पक्षामध्ये जो काही निर्णय होत असतो तो मान्य करावं लागतो. त्यामुळे सुधीर भाऊ मानले असून, भुजबळ साहेब देखील मानतील असं, यावेळी बावनकुळे म्हणाले.
महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.