बीड: बीड जिल्ह्यातील (Beed District) अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना इथे घडल्याचं समोर आलं आहे.(Beed News)
हुंड्यासाठी छळ
“पप्पा, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत. खूप त्रास होतोय,” अशी व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून एका लेकीनं सांगितली. त्यानंतर वडिलांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगितलं आणि गावी लातूरला निघून गेले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात (Bardapur Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मेघा करवे (वय 22 वर्षे, रा. साळुंकवाडी, ता. अंबाजोगाई) असं मृत विवाहितेचं नाव आहे.
लग्नानंतर काही दिवसांनी सुरु झाला छळ
मृत मेघाचे वडील भरत खज्जे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी आपली मुलगी मेघा हिचा विवाह 21 मे 2012 रोजी साळुंकवाडी येथील निखिल करवे याच्यासोबत लावून दिला होता. सुरुवातीचे काही दिवस सगळं काही ठिक होतं. काही दिवसांनी मेघाचा छळ सुरु झाला. “तुला स्वयंपाक येत नाही, घरातली काम येत नाहीत, तुझ्या वडिलांनी लग्नात आमचा मानपान केला नाही,” असं म्हणत त्रास देऊन मारहाण करण्यात आली. तसेच पिकअप व सोन्याचं लॉकेट घेण्यासाठी तीन लाख रुपये माहेरहून घेऊन ये, असं म्हणत तिला मारहाण व्हायला लागली.
मेघाच्या वडिलांनी काढली लेकीच्या सासरच्या लोकांची समजूत
नेहमीच्या त्रासाला कंटाळून मेघाने घडलेला सगळा प्रकार वडिलांना सांगितला. मुलीचा फोन आल्यावर भरत खज्जे 13 मे रोजी गावातील काही लोकांना घेऊन मेघाच्या घरी गेले. जावई आणि सासरच्या लोकांना त्यांनी समजावून सांगितले. यावेळी मेघाने वडिलांच्या गळ्यात पडून आपल्याला होत असलेला त्रास सांगितला. “पप्पा, तुम्ही लग्नात हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत. खूप त्रास होतोय,” असं तिने सांगितलं.
मेघाच्या बाबांनी समजावलं तरीही सासरच्या लोकांनी तिचा छळ थांबवला नाही. यालाच कंटाळून मेघाने वडील परतताच घरी कोणीही नसल्याची संधी साधून गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणी मेघाचे वडील भरत खज्जे यांच्या फिर्यादीनुसार पती निखिल करवे, सासू वर्षा करवे, सासरे गंगाधर करवे आणि दीर आदित्य करवे यांच्याविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.