बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांची न्यायाची मागणी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. तसेच बीड हत्या व परभणी अत्याचार प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. नागरिकांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त केला असून बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये कायद्याची भीती राहिली नसल्याचा आरोप भाजपमधील सत्ताधारी आमदार करत आहेत. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यानंतर आता संतोष देशमुख यांची मुलगी भावूक झाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यासह देशभरामध्ये या घटनेची चर्चा केली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्र दौरा केला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील या विषयावरुन जोरदार चर्चा देखील रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या सर्वपक्षीय मोर्चामधून देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार आहे. शरद पवार देखील या मूक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच मूक मोर्चात संतोष देशमुख यांनी मुलगीही सहभागी होणार आहे. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी मुलगी हिने न्याय दिला जावा अशी मागणी केली आहे. वैभवी देशमुख म्हणाली की, माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. चार जणांना अटक झाली आहे. आणखी तिघांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. शनिवारी होणाऱ्या मोर्चात मी सहभागी होणार, माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी कुठल्याही मोर्चात सहभागी व्हायला तयार आहे असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे वैभवी देशमुख म्हणाली की, “सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. माझे वडील खूप चांगले होते, देवमाणूस होते. त्यांची अशाप्रकारे हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात ही दहशत आहे की चांगल्या माणसाबरोबर असं झालं तर मग आपलं काय होईल? मला वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला सरकारने सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आत्ता पोलिसांकडून जो तपास सुरु आहे त्यावर आम्ही समाधानी नाही. या घटनेत एकूण सात आरोपी आहेत असं सांगितलं जातं आहे. त्यातल्या चौघांनाच अटक झाली आहे. बाकी तीन आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. तसंच या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. आज माझी ही मागणी आहे की माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे.” असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.