File Photo : Sharad Pawar
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. यंदाची निवडणूक ही महायुती व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात निकाल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागला. महायुतीला न भूतो न भविष्यती असा विजय मिळाला. तसेच महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्याला अगदी विरोधी पक्षनेतेपदावर देखील दावा करता येईल एवढ्या जागा मिळवता आलेल्या नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगला स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता पक्षामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
या राजकीय उलथापालथीनंतर शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. अगदी झंझावती दौरा शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये केला होता. मात्र तरी देखील शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला आहे. अवघ्या 10 जागांवर शरद पवारांच्या पक्ष गुंडाळला गेला. हाच पराभव शरद पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर आता शरद पवार पक्षांतर्गत मोठा निर्णय घेणार आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जेष्ठ नेते शरद पवार आता पक्षामध्ये ‘भाकरी फिरवणार’ आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातील विविध पदांवर बदल केले जाणार आहेत. युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष आणि विविध सेल प्रमुख यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 8 आणि 9 जानेवारी रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार असून, या बैठकीत पक्षांतर्गत बदलावर चर्चा होणार आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार यांच्या या बैठकीला पक्षातील सर्व स्तरावरील नेतृत्व उपस्थित असणार आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीला सर्व खासदार, सर्व आमदार, शहराध्यक्ष, विभागप्रमुख आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. पक्षांतर्गत बदलण्यांसाठी सर्वांची मते जाणून घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सध्या शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आहेत. जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन मतभेद देखील होत होते. असे असताना आता पक्षातील पदांमध्ये बदल होणार असल्यामुळे जयंत पाटील यांच्या पदाबाबत देखील चर्चा सुरु आहे. अजित पवार यांनी पक्षामध्ये वेगळा विचार करुन महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पक्षांमध्ये अनेक पदे रिकामी देखील असून पक्षाची पूर्ण घडी बसण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची पुन्हा एकदा पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.