खासदार बजरंग सोनवणेंच्या अडचणीत वाढ (फोटो- टीम नवराष्ट्र)
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुतीला खास करून भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा फटका भाजपला व महायुतीला बसल्याचे म्हटले जात आहे. मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला. बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे विजयी झाले व खासदार म्हणून निवडून आले. मात्र आता खासदार सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात खासदार बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अमर नाईकवाडे आणि नारायण शिरसाट यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. वाघवसे यांच्या समोर सुनावणी पार पडली. सुनावणी पार पडल्यानंतर न्यायमूर्तींनी या प्रकरणातील सर्व प्रतिवाद्यांना नोटिस बजावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.
याचिकेत नक्की काय?
हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेत काही मतदान केंद्रांवर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच पोलिंग बूथची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे आवश्यक असते. मात्र निवडणुकीच्या आधी तीन दिवस पोलिंग बूथ वाढवण्यात आले. या चुकीच्या कारभारामुळे तब्बल ४, २६१ मतदान मंतदानापासून वंचित राहिले. या मतदान केंद्रावरील मतदान हे अवैध असून, याची मतमोजणी ग्राह्य धरू नये अशी विनंती करण्यात आली आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचे साधन हे केवळ शेती आणि दुगधव्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात सांगण्यात आले आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असून त्यांनी दाखवलेली संपत्ती २०० कोटींच्या पुढे असल्याचे याचिकेत म्हणण्यात आले आहे. ते येडेश्वर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे शपथपत्रात नमूद केले नसल्याचे याचिकेत सांगण्यात आले आहे.
पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या महायुतीच्या तर बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. दरम्यान यांच्यात अगदी शेवटपर्यंत चुरशीची लढत झाली. मात्र यात बजरंग सोनवणे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी पंकजा मुंडे यांचा ६ ते ७ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. प्रतिवादी बजरंग सोनवणे यांनी शपथपत्रात खोटी माहिती भरल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणातील याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच प्रतिवाद्यांना चार आठवड्यात कारणे दाखवा अशी नोटिस देखील बजावली आहे. त्यामुळे आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.






