गुणरत्न सदावर्तेंच्या टार्गेटवर सुरेश धस, 'त्या' खुनाच्या प्रकरणात थेट नाव घेतलं, म्हणाले...
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराडवर आमदार सुरेश धस यांचे सातत्याने आरोप सुरू असून, ‘आका’ हा काही सोपा आका नाही, हा ठराविक लोकांना दर महिन्याला पेमेंट करणारा आका आहे, असे म्हणत नवा गौप्यस्फोट केला आहे. आता ‘ते’ ठराविक लोक कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर परळीत दोन दिवस तीव्र पडसाद उमटले. गुरुवारी येथे शांतता पाहावयास मिळाली. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती. आता याबाबत मुख्यमंत्री लवकरच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत त्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.
मुंडे हा ‘त्यांचा’ अंतर्गत प्रश्न
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे आणि न घेणे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीमधील अंतर्गत असलेल्या विषयांवर बोलणार नाही. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचा कोणावर दबाव वाढला आहे का? की नाही? किंवा कोणावर दबाव नाहीच. याबाबत जो काही विचार करायचा तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावा. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा. माझ्यासारख्या व्यक्तीने राष्ट्रवादीतील अंतर्गत गोष्टींवर काय बोलावे?, असं सुरेश धस यांनी म्हटलं.
मंजिली कराडांच्या आरोपांवर मौन
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी म्हटले की, बीडच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करायची असल्याची असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मला वाटते की ते दिल्लीला जाण्यापूर्वी किवा आल्यानंतर ते उज्ज्वल निकम यांची भेट घेतील, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. मंजिली कराड यांनी केलेल्या आरोपासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी आपण काहीही बोलणार नसल्याचे म्हटले आहे.
…त्या सर्वांना फाशी होईल, ही अपेक्षा
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जर पोलिसांकडून एखादी जरी त्रुटी राहिली तर न्यायालयीन चौकशीत कोणतीही त्रुटी राहू शकत नाही. मग जे कोणी आका, बाका, चाचा, मामा हे या प्रकरणातील सर्व लोक आहेत, ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्या सर्वांची न्यायालयीन चौकशी होईल आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे. जो आका आहे, तो आका सोपा आका नाही. आका १७-१७ मोबाईल वापरत होता. त्यामुळे आका काहीही करू शकतो.