फोटो - सोशल मीडिया
भंडारा : परभणी येथील कोठडीत असणारे भीमसैनिक आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध व दोन्ही घटनांसाठी कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शनिवारी (दि.21) आंबेडकरी संघटनेच्या वतीने भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
हेदेखील वाचा : विद्यार्थ्याने बनवला मानवाला घेऊन उडणारा ड्रोन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतूक करत शेअर केली पोस्ट
व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. त्यामुळे गांधी चौक ते मोठा बाजार, बसस्थानक परिसर शुकशुकाट पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी मोटारसायकल रॅली काढून बाजारपेठ बंद झाले. यावेळी आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन करून उपरोक्त प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
आंबेडकरी संघटनांचा मोर्चा
दुपारी 2 वाजता आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्यने तरुण-तरुणी आणि महिला व पुरूषांनी सहभागी घेतला. शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरी त्रिमूर्ती चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार सोनकुसरे यांना देण्यात आले.
काय आहेत मागण्या?
संविधान शिल्पाची तोडफोड करून संविधानाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकावर तसेच घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी. आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लावलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे.
कोम्बिंग ऑपरेशनमुळे आंबेडकरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान
पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे आंबेडकरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हा पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 50 लाख रूपयांची मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
हेदेखील वाचा : Year Ender 2024: या कार्सनी 2024 मध्ये भारताला ठोकला राम राम, जाणून घ्या नावं