ई-महाभूमीच्या माध्यमातून शासन झाले 'मालामाल'; अभिलेखातून 76.80 कोटींचा महसूल प्राप्त (File Photo : Mantralay)
भंडारा : नागपूरच्या राजभवनात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये नवीन 39 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. पण, भंडारा जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागते याची उत्कंठा स्थानिक जनतेला आणि आमदारांसह त्यांच्या समर्थकांना लागली होती. परंतु, जिल्ह्यात मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
हेदेखील वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राज्यसभाही नाकारली
जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तर आपल्या शिवसेनच्या उपनेतेपदाचा राजीनामा देऊन आपली नाराजी जाहीर केली आहे. जिल्ह्यातून भाजपचे विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके व भंडारा विधानसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मुख्यत्व मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. डॉ. परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.
तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु, एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपदाची शक्यता कमी असली दोघांनीही फिल्डिंग लावली होती. तूर्तास त्यांना ‘वेट अॅन्ड वॉच’शिवाय पर्याय नाही. निदान राज्यमंत्रिपदी तरी कोणाची वर्णी लागणार की नाही? यावरही आता चर्चा रंगल्या आहेत.
वर्षभरापासूनच मंत्रिपदासाठी इच्छुक
विधानसभा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळीच आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असल्याने त्यांना मंत्रिपदाची पूर्ण खात्री होती. परंतु, त्यावेळी संधीने हुलकावणी दिली. मात्र, ही कसर विधानसभा निवडणुकीनंतर भरून निघेल आणि आपल्याला मंत्री होता येईल, असा संमजसपणा दाखवून ते शांत बसले.
भंडाऱ्यातून भोंडेकर तीनवेळा विधानसभेत
2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते भंडारा क्षेत्रातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. मात्र, या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवून अग्रस्थानी असून, सत्ता समिकरणे बदलली आहेत. मंत्रिमंडळात भंडाराच नव्हे तर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलाही स्थान मिळाले नाही. भोंडेकरांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, असे शिवसेना कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, भोंडेकरांना मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली आहे.
आता डोळे पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे
दरम्यान, पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना नंबर लागणार की, महामंडळावर संधी मिळणार या चर्चेला जिल्ह्यात चांगलेच उधाण आले आहे. मात्र, तूर्तास भोंडेकरांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केल्याने थंडीतही जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती.
हेदेखील वाचा : Sangali Politics: सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ; महायुतीचे पाच आमदार असतानाही पदरी निराशाच