शिक्षणासाठी मुलांना करावी लागत होती पायपीट
अलिबाग : दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शंभरहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना शनिवारी (12 एप्रिल) रोजी मोफत सायकल देण्यात आल्या. दिलीप भोईर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. झिराड व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलो मीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळणार आहे. परिषद माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या उपक्रमामुळे शिक्षणाच्या मार्गाला गती मिळाली आहे.
ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून शाळा- महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल हे गतीचे प्रतिक आहे. हे जाणून ग्रामीण भागातील गरीब व गरजू मूली व मुलांना सामाजिक बांधिलकीतून सायकलदेण्याचे काम दिलीप भोईर यांनी चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केले. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होण्यास चालना मिळाली आहे.
सामाजिक बांधिलकी जपत दिलीप भोईर यांच्या प्रयत्नाने झिराड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम शनिवारी झिराडमधील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात राबविण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर एक वेगळा आनंद निर्माण झाला होता. सायकली मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.
आठवीपासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी घरापासून तीन किलो मीटरचा प्रवास करावा लागत होता. त्यांच्या शिक्षणाची दारे खुली व्हावीत, म्हणून विद्यार्थ्यांसाठी मोफत मिनीडोअरची व्यवस्था करण्यात आली. शाळा ते घर असा सुरक्षीत प्रवास विद्यार्थ्यांसाठी केला होता. जनतेची सेवा करण्यासाठी चॅरीटेबल ट्रस्ट सुरु केली. या ट्रस्टच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्याची संकल्पना आखली. संस्थेच्या माध्यमातून सायकल वाटप करण्याचा पहिला उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे, असे दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी सांगितले.