दीपक घाटगे/कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षादरम्यान बीकॉमचा अॅडव्हान्स अकाउंटन्सी पेपर फुटीप्रकरण गाजले होते. ३१ मे २०२३ रोजी परीक्षा सुरू होण्याअगोदर पेपर फोडण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शिवाजी विद्यापीठाने या साऱ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा प्रमाद समितीमार्फत चौकशी केली होती. अडीच महिन्यांच्या आत या प्रकरणाचा छडा लावत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या पेपर फुटीप्रकरणी कोल्हापुरातील शहाजी कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना परीक्षा प्रमाद समितीने केली होती.
कॉलेज प्रशासनाकडून चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ
विद्यापीठाच्या सूचनेनुसार कॉलेज प्रशासनाने चार कर्मचाऱ्यांना मंगळवारी सेवेतून बडतर्फ केले आहे.
पेपर फुटीप्रकरणी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात इतकी मोठी कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना आहे. एकाचवेळी चार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू होती. सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांमध्ये अधीक्षक रवी भोसले, क्लार्क सिद्धेश मिस्त्री, गणेश पाटील व विशाल पाडळकर यांचा समावेश आहे. संस्था व कॉलेज व्यवस्थापनने मंगळवारी या चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली.
शिवाजी विद्यापीठाकडून कॉलेज प्रशासनाकडून मागविला अहवाल
शिवाजी विद्यापीठाने यासंबंधी कॉलेज प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. तसेच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या सगळया प्रकाराची शहानिशा करुन कार्यवाहीवर शिक्कामोर्तब झाले.
यासंबंधी अधिक माहिती अशी की, शिवाजी विद्यापीठातर्फे बीकॉमची सहाव्या सेमिस्टर अंतर्गत परीक्षा मे २०२३ मध्ये घेण्यात आली. ३१ मे रोजी अॅडव्हान्स अकाऊंटन्सी पेपर होता. दुपारच्या सत्रात परीक्षा होणार होती. परीक्षा सुरू होण्याअगोदरच हा पेपर फुटला. पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार काही वेळातच लक्षात आला. विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ हालचाली करुन संबंधित प्रश्नपत्रिकेऐवजी दुसऱ्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे परीक्षा घेतली. नियोजत वेळेत परीक्षा सुरू करण्यास विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना जादा वेळ दिला.
साऱ्या प्रकारची गंभीर दखल
दरम्यान, विद्यापीठ परीक्षा विभाग व शहाजी कॉलेज व्यवस्थापनने या साऱ्या प्रकारची गंभीर दखल घेतली. विद्यापीठाने कॉलेज व्यवस्थापनकडून अहवाल मागविला, सीसीटीव्ही फुटेज तपासले. संस्था व कॉलेज व्यवस्थापननेही विद्यापीठ प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. शिवाय पेपर फुटीप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल, अशी स्पष्ट भूमिका संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी पहिल्या दिवसापासून घेतली.
चौघांना केले निलंबित
त्यानुसार संस्थेने या प्रकारची चौकशी करीत चौघांना निलंबित केले होते. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीकडे हे प्रकरण पोहचले. गेले दोन महिने या प्रकरणी चौकशी, म्हणणे ऐकून घेणे, कायदेशीर बाबी तपासणे या प्रक्रिया सुरू होत्या. परीक्षेच्या कामकाजाला गालबोट लागू नये यासाठी सखोल चौकशी करुन कारवाईचा निर्णय झाला. परीक्षा प्रमाद समितीने संबंधित चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासंबंधीची कार्यवाही करावी अशी सूचना शहाजी कॉलेजला सात ऑगस्टला केली.
यासंबंधी शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, पेपर फुटी प्रकरणी परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल संबंधित कॉलेजला कळविले असल्याचे सांगितले. कारवाईचे अधिकार संस्था व कॉलेज अखत्यारित असतात.
दरम्यान परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल व विद्यापीठाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करुन चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या निर्णय घेतला.
Web Title: Big action four employees were dismissed in accountancy paper leak case of shivaji university nryb