Photo Credit : Social Media
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या वर्षाच्या अखेरीस राज्याती विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या सगळ्यात एक महत्त्वाचे सर्वेक्षण समोर आले असून यामुळे भाजपची झोप उडणार असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी ‘जनसत्ता’ वृत्तवाहिनीने नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ 55-65 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच या सर्वेक्षणात राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीच्या बाजूनेकल असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगल्या जागा मिळू शकतात, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
2014 आणि 2019 मध्ये निकाल?
2019 मध्ये भाजपला राज्यात 105 जागांवर विजय मिळाला होता. तर 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यावेळच्या सर्वेक्षणा भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसत आहे. भाजपच्या अंतर्गत अहवालाचा हवाला देत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.यात भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास असल्याचे अहवालात म्हटले आहे.
दुसरीकडे नवभारत टाइम्सच्या आणखी एका सर्वेक्षणात मांडण्यात आलेल्या आकडेवारीही भाजपची डोकेदुखी वाढवणार आहे. या अहवालानुसार, एका राजकीय विश्लेषकाने मुंबईतील 36 जागांवर सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एनडीए आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 17 जागा मिळतील, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 13 जागा मिळतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीला जूनपर्यंत 18 जागा मिळण्याची अपेक्षा होती, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.
दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचा पराभव होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. या सर्व सर्वेक्षणांच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी थेट अमित शाहांवरही निशाणा साधल्याचे मानले जात आहे.