PhotoCredit- Social Media
मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभा, बैठका, मेळावे, दौरे सुरू असून राज्यभरात आढावा घेतला जात आहे. अशातच भाजपच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिग्गज नेत्यांची फौज उभी केली आहे. इतर भाजपशासित राज्यातील 60 दिग्गज नेते महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. या नेत्यांकडे महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली असून ते राज्यभरातील मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांसह मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात व इतर राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्रात पाचारण करण्यात येणार आहे. यात, कैलास विजयवर्गीय, सुनिल देवधर, प्रल्हाद पटेल, व्ही. सतिष यांच्यासह इतर काही प्रमुख नेते महाराष्ट्रात कार्यरत राहणार आहेत.
हेही वाचा: आईचे निर्बंधच ठरले तिच्या मृत्यूचे कारण; मुलीनेच दिली हत्येची सुपारी
इतर भाजपशासित राज्यातील या 60 नेत्यांची फौज महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित जागांचा आढावा घेणार आहेत. राज्यातील 288 मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर हे प्रवासी नेते आपला अहवाल प्रभारी भुपेंद्र यादव यांना सादर करणार असल्याची माहिती आहेत. या अहवालाच्या आधारे निवडणुकीच्या संदर्भात निर्णय होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले असून आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. मतदारसंघांचा दौरा करणाऱ्या या नेत्यांची मुंबईतील भाजप मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीच भाजप प्रभारी भुपेंद्र यादव, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, माजी मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेेळी ज्या जागांवर भाजपचेच उमेदवार राहणार आहे, त्या मतदारसंघांसाठी भाजप नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे. इतकेच नव्हे तर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी या नेत्यांकडून0 नियोजन केले जात आहे.
हेही वाचा: बाबर आझमला राग अनावर; नवतरुण 26 वर्षीय गोलंदाजावर काढला राग
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचार मैदानात उतरणार आहेत.या नेत्यांकडे विशिष्ट मतदार संघाची जबाबदारी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशी पुन्हा निर्माण होऊ नये. यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यात येणार आहे. यात लाडकी बहीण योजनेचा लाभ करून घेेण्यासाठी अनेक महिलांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.