Pakistan Champions Cup 2024 : पाकिस्तान चॅम्पियन्स चषक 2024 हा 12 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांसारखे अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. रविवारी स्टॅलियन्स आणि मार्कहोर्स यांच्यात एक रोमांचक सामना झाला, ज्यामध्ये बाबर आझम चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बाबर आझमने युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीला सलग पाच चौकार ठोकले.
बाबर आझमला राग अनावर, सलग 5 चौकार ठोकले
Dahani vs Babar 📸 #UMTMarkhorsvAlliedBankStallions #DiscoveringChampions #BahriaTownChampionsCup pic.twitter.com/hXyCY8evW8
— Bahria Town Champions Cup (@championscuppcb) September 15, 2024
एका षटकात सलग पाच चौकार
50 षटकांच्या सामन्यात विजयासाठी 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने मुक्तपणे शॉट्स खेळले. आठव्या षटकात, त्याने षटकाचा पहिला चेंडू 26 वर्षीय वेगवान गोलंदाज डहाणीला रिकामा जाऊ दिला, परंतु त्यानंतर पुढचे सर्व चेंडू त्याने सीमारेषेबाहेर पाठवले. बाबरने शॉर्ट बॉलपासून ते फुलपर्यंत सर्व प्रकारच्या चेंडूंचा सामना केला आणि स्क्वेअर ड्राइव्हपासून ते पुल शॉटपर्यंत खेळला.
45 चेंडूत 45 धावा करून बाद
बाबर आझमने 45 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या. जोपर्यंत बाबर आझम क्रीजवर होता तोपर्यंत स्टॅलियन्स सामना जिंकण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत होते, परंतु लवकरच परिस्थिती बदलली. पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात लेगस्पिनर जाहिद महमूदच्या चेंडूवर बाबर बाद झाला. नसीम शाहने शॉर्ट फाईन लेगवर सोपा झेल घेतला. झाहिद महमूदने 4.4-0-18-5 अशा प्रभावी आकड्यांसह कहर केला.
तरीही बाबरचा संघ हरला
बाबर आझम बाद झाला तेव्हा त्याच्या संघाची धावसंख्या 23.4 षटकात 105 धावा होती. पण इथून स्टॅलियन्सने 8.4 षटकांच्या कालावधीत केवळ 26 धावांत त्यांचे शेवटचे आठ विकेट गमावले. बाबर सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे, त्याने दोन सामन्यांत 60.50 च्या सरासरीने 121 धावा केल्या आहेत. मार्कहोर्सने त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर स्टॅलियन्सने दुसरे स्थान पटकावले.