मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली. महायुतीला राज्यामध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्याचा परिणाम केंद्रातील सरकार स्थापनेवर देखील दिसून आला. देशामध्ये भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता आले नाही. राज्यामध्ये 45 पारचा नारा दिलेल्या युतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेत राजीनाम्याचे वक्तव्य केले. यानंतर भाजपची दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. तसेच अमित शाह यांच्यासोबत देखील फडणवीस यांनी चर्चा केली. यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधत राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. यावेळी विरोधकांवर टीका करत देवेंद्र फडणवीस हा पळून जाणारा माणूस नाही तर पराभव देखील अंगावर घेणारा माणूस आहे असा एल्गार फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीला आलेले अपयश पूर्णपणे विश्लेषण करुन समजून सांगितले. तसेच विरोधकांना इशारा देखील दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशामध्ये तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलेलं आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात आपलं सरकार आलेलं आहे. मोदीजी काल बोलले, काही लोकं विजयाचं नरेटिव्ह तयार करतात. त्यांना मागील तीन निवडणुका मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला एकाच निवडणुकीत देशात मिळाल्या आणि संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या आहेत, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
मी पळणारा व्यक्ती नाही
पुढे त्यांनी राज्यातील पराभवाची जबाबदारी पुन्हा एकदा स्वीकारली. फडणवीस म्हणाले, यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं. ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. भाजपचं नेतृत्व मी करत होतो. म्हणून अपयशाची जबाबदारी माझी आहे हे मी सांगितलं. मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, असं मी म्हटलं तेव्हा निराशेतून म्हटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. आम्ही लढणारे आहोत. चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. कुणाला वाटलं असेल मी निराश झालो किंवा भावनेच्याभरात राजीनाम्याचं बोललो असं नाही. माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती. त्यावर मला काम करायचं होतं. अमित शाह यांना मी भेटलो. त्यांनाही मी माझ्या डोक्यात काय हे सांगितलं. पण सध्या ही वेळ नसल्याचं अमित शाह म्हणाले. आपण नंतर एकत्र बसून महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करू असं शाह म्हणाले, अशी माहिती देतानाच निवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. एक मिनिटंही मी शांत बसणार नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.
‘हा’ चौथा पक्ष विरोधात काम करत होता
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो तर आपण चौथ्या पक्षाशीदेखील लढत होतो, तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह. आपल्याला वाटलं की, या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या हे लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरीता काम करत आहे, त्याला आपण रोखू शकलो नाहीत. संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला पण त्यामानाने आपण त्याला प्रतिकार केला नाही. त्याचा परिणाम आपल्या लक्षात आला तेव्हा चौथ्या टप्प्यात निवडणुक आली होती. पण असा जरा नरेटीव्ह तयार झाला तरी तो एखाद्या निवडणुकीमध्ये फक्त चालतो. तुम्ही सर्वांनी उत्तम काम केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आपण कमी पडलो. महाविकास आघाडीला मिळालेली मत 43.09 टक्के आणि महायुती मिळालेली मत 43.07 टक्के आहेत. म्हणजे फक्त 0.3 टक्के मतांचा फरक आहे. पण त्याचा परिणाम असा झाला की तिकडे 31 आहेत आणि इकडे 17 आहेत. त्यांना आपल्या पेक्षा केवळ 2 लाख मत अधिक मिळाली आहेत. मात्र जागांमध्ये ते मोठ्या प्रमाणात दिसत आहे. असे लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.