Photo Credit- Team Navrashtra
अहमदनगर: राज्यातील विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणाही झालेली नाही. पण त्यापूर्वीच महायुतीतील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. अहमदनगरच्या राजकारणातून अशीच एक बातमी समोर आली आहे. भाजप नेते राजेंद्र पिपाड यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विधानभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये हा वाद उफाळून आल्यामुळे अहमदनगरमध्ये राजकारण चांगलचं तापल आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांमुळे अहमदनगरमध्ये भाजपची अधोगती झाली आहे. विखेपाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आहे. त्याला मारायचं म्हटलं तर ती चप्पल महादेवाला लागते, अशी सणसणीत टीका राजेद्र पिपाडा यांनी केली आहे. राहाता शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.त्यांच्या या आरोपांमुळे आता भाजपमध्येच वादाची ठिणगी पडली आहे.
हेदेखील वाचा: भाजपने डाव टाकला; माजी मुख्यमंत्री गळाला लागला, ‘या’ दिवशी होणार प्रवेश
दरम्यान, 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पिपाडा आणि राधाकृष्ण विखेपाटील यांच्या जोरदार लढत झाली होती. त्यावेळी पिपाडा यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान, 2019 साली काँग्रेसला रामराम करत राधाकृष्ण विखे पाटीलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या पिपाडा आणि विखेपाटील यांच्यात 2019 मध्ये मनोमिलन घडवण्यात देवेंद्र फडवीसांना यश आले. पण लोकसभेला शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण लोकसभेत सुजय विखेंचा पराभव झाला. या पराभवामुळे बॅकफूटवर गेलेल्या विखेंना आता पुन्हा एकदा राजेंद्र पिपाडांनी आव्हान दिलं आहे. पण दुसरीकडे या सर्व गोष्टींवर सध्या विखे पाटील यांनी मौन बाळगणं पसंत केलं आहे.
पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच जागा पाडण्यामागे विखेपाटील असल्याचा आरोप राम शिंदे यांच्यासह भाजपच्या एका गटाने केला होता. त्यातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पिपाडांनी पुन्हा एकदा विखे पाटलांविरोधात शड्डू ठोकल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभेसाठी त्यांनी शिर्डी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायलाही सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पिपाडांच्या या आरोपांवर विखेपाटील काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा: भारतात टेलिग्रामवर बंदी येणार? सरकारचा तपास सुरु