पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांविषयी बेताल आणि बेभान वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांमुळे भाजपचा बुरखा फाटला असुन, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टीका राज्याचे माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
पुणे काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले,‘‘ कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी शिक्षण संस्थांसाठी मदत मागितली असले, त्याला कोणी भिक म्हणते का ? मात्र भाजपचे नेते व मंत्री असे बोलून महापुरुषांच्या अपमान करत आहेत. महापुरुषांवर आघात करणार्या वक्तव्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करताे.’’
कर्नाटक व सीमा प्रश्नावर बोलताना थोरात यांनी ‘‘ सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयात बाजू भक्कम मांडली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, त्यावर काहीच कृती केली जात नाही’’ अशी टीका केली.
राज्यात शिंदे सरकार कसे सत्तेवर आले आहे, हे लहान मुलांनाही माहिती असल्याचे नमूद करीत ‘‘ कर्नाटकचे मुख्यमंत्री राज्याची अवहेलना करत आहेत, ते दिल्लीत जावून मंत्र्यांना भेटत आहेत. मात्र आपले मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते त्यावर एक शब्द बोलत नाही. खरे तर त्यांनी गुवाहाटी ला जाण्यापेक्षा दिल्लीला जायला हवे होते,’’ अशी टीका केली.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात थोरात यांनी राज्य सरकारवर टीका केली. काँग्रेस भवन येथे शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री रमेश बागवे, सप्ताहाचे आयोजक प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, दत्ता बहिरट, रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, मनीष आनंद, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलतांना थाेरात म्हणाले, सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘युपीए’ सरकारने सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. मुक्त अर्थव्यवस्थेला चालना दिली. माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना, रोजगार हमी योजना अशा लोकोपयोगी निर्णय घेतले हाेते. गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्य, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल माध्यमातून दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले.
शहराध्यक्ष शिंदेंची अनुपस्थिती
पुणे शहर काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित नसतात, त्यांना कार्यक्रमाची माहिती नसते, पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे का या प्रश्नावर थोरात म्हणाले, पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. पक्ष एकसंघ आहे. व्यक्तीगत कामामुळे पक्षाचे शहराध्यक्ष शिंदे कार्यक्रमास उपस्थित राहू शकलेले नाहीत.