(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेता आणि राजकारणी थलापती विजय यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट “जन नायकन” प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट ९ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, परंतु चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही. चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने, केव्हीएन प्रॉडक्शन्सने या मुद्द्याबाबत मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कंपनीने न्यायालयाला सेन्सॉर बोर्डाला तातडीने प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. मद्रास उच्च न्यायालयाने ६ जानेवारी रोजी निर्मात्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी करणार असल्याचे सांगितले आहे.
५०० कोटी रुपयांच्या बजेटसह बनवलेल्या “जन नायकन” च्या निर्मिती कंपनीनुसार, हा चित्रपट डिसेंबरमध्ये सेन्सॉर बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी सादर करण्यात आला होता. बोर्डाने काही सीन कापून काही संवाद म्यूट करण्याचा सल्ला दिला होता, जो स्वीकारण्यात आला आणि चित्रपट पुन्हा सादर करण्यात आला. दुसऱ्या पुनरावलोकनानंतर, बोर्डाने तो U/A प्रमाणपत्रासाठी योग्य घोषित केला. परंतु, एका तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की चित्रपट धार्मिक भावना दुखावत आहे. या आधारे, बोर्डाने चित्रपट एका पुनरावलोकन समितीकडे पाठवला.
‘जन नायकन’ बद्दल निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे युक्तिवाद
निर्मात्या कंपनीचा असा युक्तिवाद आहे की तक्रारदाराने चित्रपट पाहिलेला नाही, मग असे आरोप कसे केले जाऊ शकतात? म्हणून, विलंब न करता प्रमाणपत्र जारी केले पाहिजे असे त्याने म्हणणे आहे. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे की तक्रार मिळाल्यानंतर चित्रपटाची पुनर्तपासणी करणे आवश्यक आहे आणि निर्धारित वेळेत प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणता येणार नाही. कायद्याचा हवाला देत, बोर्डाने म्हटले आहे की संपूर्ण प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे. आणि त्यामुळे चित्रपटाचे प्रमाणपत्र थांबवले आहे.
मद्रास उच्च न्यायालयात ‘जन नायकन’ चित्रपटावर सुनावणी
न्यायाधीश पी.टी. आशा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाविरुद्धच्या तक्रारीची प्रत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. सुनावणी एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात करण्यात आली. सुनावणीदरम्यान, सेन्सॉर बोर्डाच्या वकिलाने आग्रह धरला की प्रदर्शनाची तारीख निश्चित केली असली तरी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करता येणार आहे.
‘जन नायकन’ या चित्रपटाबाबत न्यायालयाने दोन्ही पक्षांकडून उत्तरे मागितली
न्यायाधीशांनी निर्मिती कंपनीला विचारले की, चित्रपटाचे प्रदर्शन १० जानेवारीपर्यंत का पुढे ढकलले जाऊ शकत नाही. कंपनीच्या वकिलांनी उत्तर दिले की, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधीच जाहीर करण्यात आली आहे आणि ती बदलणे कठीण आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती पी.टी. आशा यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला (सीबीएफसी) बुधवारी, ७ जानेवारी रोजी ‘तक्रारी’ची प्रत सादर करण्यास सांगितले, ज्यामध्ये चित्रपट ‘धार्मिक भावना दुखावतो’ असा दावा करण्यात आला आहे.
KGF स्टार यशची नवी हीरोइन कोण? 800 कोटींचा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीची Toxic मध्ये एन्ट्री
प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी घेणार निर्णय
व्ही. विनोद दिग्दर्शित “जय नायकन” मध्ये विजय, पूजा हेगडे, ममिता बैजू आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही, जरी टीमने सर्व काम पूर्ण केल्यानंतर १८ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपट सीबीएफसीकडे सादर केले होते. १९ डिसेंबर रोजी निर्मात्यांना काही बदल करण्यास सांगण्यात आले होते, जे त्यांनी केले, परंतु तरीही त्यांना अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असताना, तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे.






