Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंकडून माझे १ लाख रुपये घेऊन या....: ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis News: “मी मुंबई महापालिका सोडून दुसऱ्या कोणत्याही महापालिकेच्या सभेतील भाषण काढून पाहा. मी मुबंईत फक्त विकासावर बोलतो. मी विकासावर ९० टक्के आणि उत्तरे १० टक्के देतो. माझी निवडक चार भाषणे काढा आणि ती उद्धव ठाकरेंना द्या, आणि माझे एक लाख रुपये आणून द्या, अशा शब्दातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पलटवार केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ठाकरे बंधुच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले होते. या आव्हानाला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ” देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मी तुम्हाला आव्हान देतो. तुमच्या मोदींपासून तुमचं आणि तुमच्या चेल्या चपाट्यांचं, अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी, हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सगळे तुम्हाला एक लाख रुपये देतो.” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले होते. उद्धव ठाकरेंचे आव्हान स्विकारत फडणवीस यांनी शेलक्या शब्दांत टिका केली आहे. ” मी दिलेले आव्हान उद्धव ठाकरे अजूनही पूर्ण करू शकले नाहीत. माझे आव्हान होते की उद्धव ठाकरेंचे विकासावर एक भाषण दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, पण आता मी सात हजार रुपयांचे चॅलेंज देतो की उद्धव ठाकरेंचे विकासावर एक भाषण दाखवा आणि सात हजार रुपये माझ्याकडून घेऊन जा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.
कोस्टल रोडचा विकास आपण केला, असा दावा उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की,”कोस्टल रोडची संकल्पना जुनी होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोस्टल रोड हा माझा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले होते. पण केंद्रात आणि राज्यातही त्यांचे सरकार असूनही काही फायदा झाला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोस्टर रोडच काम हाती घेतलं. कोस्टल रोड करणे कठीण नव्हते. त्याच्या परवानग्या काढणे कठीण होते. पर्यावरणाशी संबंधित काही नियमांमुळे या रोडसाठी परवानगी मिळत नव्हती. त्यात सर्वकाही बदलण्याची गरज होती. दोन वर्षात अनेक मंत्री बदलले, पाच बैठका झाल्या, पाचव्या बैठकीनंतर मान्यता मिळाली. त्यातही शेवटच्या बैठकीतही त्यांनी एका गोष्टीवरून अडवणूक केली. कोस्टल रोडमुळे २५० एकर खुली जागा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नव्याने रिअल इस्टेट तयार करा, पण मी माझ्या सहीचे अॅफिडेविट दिले आणि इथे रिअल इस्टेट नाही. मैदाने आणि प्रोमोनाड करू, असे सांगितले. त्यानंतर त्याला मान्यता मिळाली.
त्यानंतरही त्यावेळी एकनाथ शिंदे हे MSRDCचे मंत्री होते त्यामुळे हे काम MSRDCने करावे अशी त्यांची इच्छा होती. MMRDA देखील हे काम करायला तयारी होती. पण उद्धव जी यांचे म्हणणे होते की हे काम महानगरपालिकेला करू द्या. त्यातही हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात केस दाखल झाली होती. त्या केसेस लढलो आणि आम्ही जिंकलो. एवढं सगळ करूनही एक दिवस उद्धव ठाकरे यांनी मला न सांगता कोस्टल रोडचं भूमीपूजन केलं. मला न बोलवता केलं. मला बीएमसीच्या आयुक्तांनी फोन करून भूमीपूजनाचा माहिती दिली. उद्धव ठाकरेंनी भूमीपूजन करत असल्याचे सांगितले. पण आपण सांगत असाल तर आम्ही पुन्हा भूमीपूजन करण्यासाठी तयार असल्याचे बीएमसी आयुक्तांनी सांगितले. मी त्यांना सांगितलं की मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही. त्यांना भूमीपूजन करूद्या, मी कोस्टल रोडचं उद्घाटन करेल. अशा प्रकारे कोणत्याही सैविधानिक पदावर नसताना त्यांनी हे सर्व केलं. कोस्टर रोड आम्हीच पूर्ण केला, त्याचा पहिला, दुसरा आणि शेवटचा टप्पाही आम्हीच उद्घाटित केला. सगळं काम आम्हीच केलं. त्यामुळे ते जे श्रेय घेत आहेत, ते म्हणजे त्यांनी कधीतरी दाखवलेलं प्रझेंन्टेशन आणि भूमीपूजन. यापलीकडे त्यांचे काहीच श्रेय नाही.






