अखेर बुलढाण्यातील त्या गावांमधील केसळतीमागचं कारण आलं समोर; तर तुमच्याही भागात पसरू शकतो आजार
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यात अचानक केसगळतीची समस्या सुरू झाली होती. अचानक टक्कल पडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. शेगाव तालुक्यातील 12 गावं केसगळतीनं बाधित आहेत, तर नांदुरा तालुक्यातील एका गावात केसगळतीचे रुग्ण आढळून आले होते. दरम्यान अनेक मेडीकल संस्थानी संशोधन करूनही या आजाराचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं, मात्र डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी या भागातील रुग्णांवर संशोधन करून केसगळतीचं कारण शोधून काढलं आहे. हिम्मतराव बावस्कर यांनी याआधीही विंचूदंशावरील औषध शोधून काढलं होतं. त्यांना पद्श्री पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे.
डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीनं बाधित गावांना 17 जानेवारीला भेट दिली. रुग्णांचं रक्त, केस, लघवी, या भागातला कोळसा, माती, पाणी आणि राखेचे नमुने गोळा केले. या भागात उगवणाऱ्या तूर, गहू, ज्वारीसारख्या धान्याचे नमुने आणि त्यासोबतच भाजीपाल्याचे नमुने सुद्धा गोळा केले. सर्व नमुन्यांची खासगी लेबोरेटरीमध्ये तपासणी केली असता त्यांना रुग्णांचे केस का गळतात याचं कारण सापडलं. केसगळतीने बाधित रुग्णांच्या लघवी, रक्त आणि केसांमध्ये सेलेनियमचं प्रमाण दहापटीनं जास्त आढळून आलं आहे, तर रक्तातील झिंकचं प्रमाण कमी झालेलं आढळलं आहे. त्यामुळेच केसगळती होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
जमिनीतही फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे. यामुळे धान्यातील झिंकचं प्रमाण कमी होतं. हा भाग खारपान पट्टा आहे. त्यामुळे, या भागातली माती अल्कलाईन आहे. या भागात मोठ्या प्रमाणात फॉस्फेटसारख्या खतांचा वापर होतो. त्यामुळे धान्यात झिंक न वाढता ते मातीत विरघळून जाते. धान्यातील झिंकचं प्रमाण कमी होते. या धान्यामधून शरीराला आवश्यक तितकं झिंक मिळत नाही. इतकंच नाहीतर माती, कोळसा आणि राखेत फॉस्फरसचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे. या भागातील बोअरवेलच्या पाण्याची सुद्धा तपासणी करण्यात आली. यात सुद्धा झिंकंचं प्रमाण कमी आढळून आलं. त्यामुळे लोकांनी या पाण्याचा वापर करू नये. तसेच सरकारनं सुद्धा या लोकांना पिण्यासाठी चांगलं पाणी द्यावं, असाही सल्ला डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी दिला आहे. एका डीजिटल वृत्त वाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
बुलढाण्यात केसगळतीचं पहिलं प्रकरण 31 डिसेंबरला समोर आलं होतं. शेगाव तालुक्यातील बोंडगावात एका कुटुंबाती महिलेचे आणि दोन मुलींचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. पण, शाम्पूमुळे केस गळत असं त्यांना सुरुवातीला वाटलं. सुरुवातीचे तीन दिवस त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण, चौथ्या दिवशी अर्ध्यापेक्षा कमी केस डोक्यावर शिल्लक राहिले. त्यामुळे त्यांनी खासगी डॉक्टरांना दाखवलं. चुकीचा शाम्पू वापरल्यामुळे ही केसगळती होत असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. दुसऱ्याच दिवशी गावात केसगळतीचं आणखी एक प्रकरण समोर आलं. या व्यक्तीनं कधीही शाम्पूचा वापर केला नव्हता. त्यामुळे हा काहीतरी गंभीर प्रकार असल्याचं निष्पन्न झालं. ही बाब कळताच बोंडगावचे सरपंच रामा पाटील थारकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली. आता जिल्ह्यात जवळपास २२२ रुग्णांना याची लागण झाली आहे.