Amrut ST Bus Free Travel Scheme
ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा वाढत्या वयामुळे देवदर्शनाला, नातेवाईकांना भेटण्यासाठी जाण्याची इच्छा निर्माण होऊन देखील आर्थिक बजेटमुळे प्रवास खर्च परवडत नसल्याने मनातली इच्छा मनातच ठेवावी लागत होती. मात्र, राज्य परिवहन महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांसाठी ‘अमृत’ मोफत प्रवास योजना अमलात आणून, एकप्रकारे त्यांना दिलासा देण्याचे काम केले. परिवहन मंडळाच्या या ‘अमृत’ मोफत प्रवास योजनेमुळे आता ज्येष्ठांना नातेवाईकांना भेटणे, धार्मिकस्थळांना जाणे तसेच विविध वैयक्तिक कामांसाठी प्रवास करणे अधिक सोयीचे झाले, राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’ बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण झाले आहेत.
विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. गावातून तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस हा अनेकांचा प्रमुख प्रवासाचा पर्याय आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा आगारातून १३ लाख ४३ हजार १७२ प्रवाशांनी अमृत योजनेचा लाभ घेतल्याची नोंद झाली. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देतानाच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेतून होत आहे. मोफत प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक आत्मविश्वासाने प्रवास करत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हीच या योजनेच्या यशाची खरी पावती ठरत आहे.
७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्यात कुठेही देवदर्शनाला जाण्याची इच्छा निर्माण झाल्यास, आता कुठलीही चिंता करायचे कारण राहिले नाही, परिवहन विभागाच्या ‘अमृत’ मोफत प्रवास योजनेअंतर्गत धार्मिकस्थळांना जाण्यासाठी मोफत प्रवास करण्यास मिळत असल्याने पैशाची चिंता राहिली नसल्याने, एसटीच्या सुखकर प्रवासाला ज्येष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये महिला सन्मान, अमृत ज्येष्ठ योजनांचा समावेश असून, या योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना एनसीएमसी कार्ड आवश्यक आहे. एसटीच्या मोफत योजनांमुळे महिला आणि वृद्धांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिक, जनार्दन पवार म्हणाले की, देवदर्शनाला खाजगी वाहनाने जाण्यासाठी अतिरिक्त खर्च येत होता. आर्थिक बजेट नसल्याने धार्मिकस्थळांना जाण्याची इच्छा असून, देखील जाता आले नाही. मात्र परिवहन विभागाच्या अमृत’ मोफत प्रवास योजनेमुळे देवदर्शनाला जाण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
बुलढाण्याचे विभागीय नियंत्रक, शुभांगी शिरसाट म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी सन्मान, अमृत योजना, ज्येष्ठांसाठी योजना या माध्यमातून नागरिकांच्या प्रवासावर झालेला खर्च शासनाच्या वतीने प्रतिपूर्ती म्हणून दिल्या जातो.






