File Photo : Nitin Patil
सातारा : सातारा जिल्ह्याला खासदार उदयनराजे यांच्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांच्या रूपाने आणखी एक खासदार मिळणार आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोनपैकी एका जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून नितीन पाटील यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीने वाई तालुक्यासह जिल्ह्यात विशेषतः नितीन पाटील समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान नितीन पाटील यांना खासदार करतो, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई येथील सभेत दिला होता. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतली होती.
अजित पवारांनी प्रचारात दिलेला शब्द पाळला
महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बदल्यात राज्यसभेची जागा भाजपकडे मागितली होती. ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाली असून, या जागेवर आता नितीन पाटील यांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे वाईसह राष्ट्रवादीच्या गोटात आनंद द्विगणित झाला आहे.
अजित पवारांनी केली वाईकरांची अपेक्षापूर्ती
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाई येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, मी नितीन पाटील यांना खासदार करतो, असा शब्द दिला होता. हा शब्द पाळत अजित पवार यांनी वाईकरांची अपेक्षापूर्ती केली आहे.
नव्या राजकीय इनिंगला सुरूवात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. राज्यसभेच्या निमित्ताने नितीन पाटील यांची नवी राजकीय इनिंग सुरू होत असून सातारा जिल्ह्याला पाटील यांच्या रूपाने दुसरा खासदार मिळाला आहे.