पुणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रभू रामांवरील वक्तव्यावरुन राजकारण तापले आहे. दरम्यान, पुण्यामध्ये (Pune) आव्हाडांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त विधान करत धार्मिक भावना दुखावल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) शिबिरामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधारी भाजप (BJP) आक्रमक भूमिका मांडत होती. राज्यभरामध्ये आंदोलनं केल्यानंतर आता पुण्यामध्ये भाजपाने केलेल्या तक्रारीवरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काल (दि.04) आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यावरुन कारवाई करत पुण्यातील विश्रामबाग वाडा पोलीस ठाण्यामध्ये कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या जाहीर शिबिरामध्ये प्रभू श्रीरामांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. राम हे बहुजनांचे असून क्षत्रिय लोकांचे प्रतिनिधीत्व करत होता. जंगलामध्ये 14 वर्षे त्याने शिकार करत मासांहार केला असे विधान आव्हाड यांनी केले होते. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आणि सत्ताधारी पक्षांनी जोरदार टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली. यानंतर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असे म्हणत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही, आव्हाडांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.