Chandrapur News: चंद्रपूरमध्ये इथेनॉल प्रकल्पाच्या दूषित पाण्याचा फटका; ब्रह्मपुरीतील सात गावांत त्वचारोगाचा प्रकोप
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १६ जुलै रोजी पाठवलेल्या शासकीय पत्रात इथेनॉल प्रकल्पाच्या बेजबाबदार आणि प्रदूषणकारी कारभारावर स्पष्ट बोट ठेवले होते. या रासायनिक सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी प्रचंड दूषित झाले असून, हेच पाणी पिण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले होते. या पत्राची तत्काळ दखल घेत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने ब्रह्मपुरी तालुका वैद्यकीय प्रशासनाला संबंधित बाधित गावांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले होते.
जिल्हा आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या तालुका प्रशासनाच्या आरोग्य पथकाने ब्रह्मपुरी परिसरातील सातही बाधित गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष आरोग्य तपासणी व सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक ग्रामस्थ गंभीर त्वचा रोगाने ग्रस्त असल्याचे उघडकीस आले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
दूषित पाण्यामुळेच हा आजार वेगाने पसरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हा सविस्तर तपासणी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या अहवालाने इथेनॉल प्रकल्प व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा पूर्णपणे उघड्यावर आणला असल्याचे नागरिकांचे मत आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकृत अहवालात १९८ रुग्ण आढळल्याचे सिद्ध झाल्यामुळे आता चेंडू जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोर्टात आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणल्याप्रकरणी आणि परिसरातील पाणी विषारी केल्याप्रकरणी संबंधित इथेनॉल प्रकल्प व्यवस्थापनावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल होणार का? प्रभावित सातही गावांना तत्काळ शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन काय ठोस उपाययोजना करणार? आरोग्य विभागाच्या या अहवालानंतर आता वरिष्ठ पातळीवरून या प्रदूषणकारी इथेनॉल प्रकल्पाचे कुलूप ठोकले जाणार की नेहमीप्रमाणे कारवाई कागदावरच राहणार, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार इथेनॉल प्रकत्यातून निघणाच्या पाण्यामुळे प्रभावित संभाव्य क्षेत्राची त्वरित दखल घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उदापूर, बोरगाव, झीलबोडी, पारडगाव, परसोडी, पेटवार्ड आणि फुलेनगर या सातही गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत सखोल सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
या सर्व्हेक्षणामध्ये पेटवार्ड आणि फुलेनगर हे दोन भाग ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्या’च्या कार्यक्षेत्रात येत असून, उर्वरित उदापूर, बोरगाव, झीलबोडी, पारडगाव आणि परसोडी ही पाच गावे प्राथमिक आरोग्य केंद्र, चौगान अंतर्गत येतात, सर्व बाधित व लगतच्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी प्राधान्याने करण्यात आली आहे. सर्व्हेक्षणाचा सविस्तर अहवाल जिल्हा आरोग्य कार्यालयास सादर करण्यात आला आहे. – डॉ. मंदोधरा सुखदेवे, तालुका वैद्यकीय अधिकारी, ब्रह्मपुरी






