नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्...; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Nashik Earthquake News Marathi: नाशिक जिल्ह्याला गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सुरगाणा, कळवण आणि पेठ या तीन तालुक्यांतील विविध भागांत हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी कळवण तालुक्यातील दळवट परिसरात दुपारी ३.३८ वाजता, तर पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरातही दुपारी ३.३८ वाजता सौम्य धक्के जाणवले.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. तथापि, प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS), नवी दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक पाहणीसाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून, भूकंपाच्या केंद्रबिंदू, तीव्रता आणि भौगोलिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या परिसरात २५ जुलै २०२६ पासून सौम्य भूकंपीय हालचाली सुरू आहेत. या कालावधीत सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
२९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ९ भूकंपांची नोंद करण्यात आली आहे. या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ ते ३.९ इतकी होती. विशेष म्हणजे, नोंदविण्यात आलेल्या ९ धक्क्यांपैकी ७ धक्के ३.० किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे होते. या मालिकेतील सर्वाधिक तीव्र भूकंप २८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.२७ वाजता नोंदविण्यात आला असून त्याची तीव्रता ३.९ इतकी होती.
या सौम्य भूकंपीय हालचालींवर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे (NCS) तज्ज्ञ सतत लक्ष ठेवून असून, जिल्हा प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या भूकंपांमुळे कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Nashik Kumbh Mela: पंचवटीतील पेठ रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग






